मालवणात 35 हून अधिक कातळशिल्पांचा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिह्याच्या पुरातत्त्व वैभवात भर घालणारी आणखी 35हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले, (तालुका- मालवण) गावच्या धनगरवाडी सडय़ावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, येथे आढळलेले ’लज्जागौरी’सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे अशी शक्यता आहे. मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.

सतीश लळीत गेली 21 वर्षे सिंधुदुर्ग जिह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहेत. कातळशिल्पे शोधण्याचे प्रयत्न सुरू असताना खोटले येथील माळरानावर ‘वेताळा’चे चित्र कोरलेले आहे, अशी माहिती मिळाली. त्यांना खोटले आणि पोईपच्या सीमेवर टेकडीच्या उतारावरील जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती निदर्शनास आली.

‘लज्जागौरी’सदृश शिल्पाचे अस्तित्व;चिरेखाणींच्या विळख्याने प्राचीन वारसा धोक्यात

– या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य 12 अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. एका छोटय़ा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची 30 कातळशिल्पे आढळून येतात. या ठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, अशी माहिती लळीत यांनी दिली.

– या सर्व परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी ‘पांडवांची चित्रे’ नष्ट झाली असे स्थानिकांनी सांगितले. याच ठिकाणी असणाऱया सुमारे 20 फूट लांब व 20 फूट रुंद कातळशिल्पावर चिरेखाणीतील खराब तुटके चिरे व माती टाकून दिल्याने ते अत्यंत महत्त्वपूर्ण कातळशिल्प मातीखाली गेले, असे स्थानिकांनी सांगितले. या चिरेखाणी अशाच अनिर्बंधपणे सुरू राहिल्यास भविष्यात यापैकी अनेक कातळशिल्पे काळाच्या उदरात गडप होण्याची शक्यता आहे.

– सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिह्यांत जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. त्यांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवी सन पूर्व 20 ते 10 हजार वर्षे) काळात झाली असावी.

– ‘वेताळा’चे हे कातळशिल्प पाहिल्यावर या परिसरात आणखी काही अशाच प्रकारची कातळशिल्पे असण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यांनी सडय़ावर शोध घेतला असता ठिकठिकाणी 35 हून अधिक कातळशिल्पे आढळून आली. शिल्पांमध्ये भरलेली माती काढून, स्वच्छता करून मोजमापे घेण्यात आली.