मालवण – टायर फुटून कार झाडावर आदळली

431

देवगड येथून मालवणच्या दिशेने येत असलेल्या प्रशांत भीमराव भोसले यांच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला आहे. पुढील टायर फुटल्याने गाडीचे नियंत्रण सुटून हडी डोनी स्टॉप येथील रस्त्यानजीच्या झाडाला कार आदळली. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. या अपघातात जखमी प्रशांत भोसले यांना हडी सरपंच महेश मांजरेकर व ग्रामस्थांनी तातडीने तोंडवळी येथील गणेश तोंडवळकर यांच्या रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अपघातानंतर गाडीतील एअरबॅग उघडली गेल्याने प्रशांत यांचा जीव वाचला. मात्र गाडी उजव्या बाजूने कलंडल्याने प्रशांत यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. तसेच मुका मार लागला. तर गाडीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावेळी त्याठिकाणी असणारे हडी गावचे सरपंच महेश मांजरेकर, ग्रामस्थ दिनेश सुर्वे व इतर ग्रामस्थानी अपघातस्थळी धाव घेत गाडीत अडकलेल्या प्रशांत यांना बाहेर काढले.

तोंडवळी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश तोंडवळकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची रुग्णवाहिका मागविण्यात आली. चालक विनायक मुळे यांच्या ताब्यातील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यावर जखमी प्रशांत भोसले यांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी प्रशांत यांच्या दुखापतग्रस्त हातावर प्राथमिक उपचार करत अधिक उपचारासाठी ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात पाठविले.

आपली प्रतिक्रिया द्या