किनारपट्टी 36 तासांसाठी ‘सील’, सुरक्षेचा आढावा घेणारी सागर सुरक्षा कवच मोहीम

616

सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण समजली जाणारी सागर सुरक्षा कवच मोहिम बुधवार 20 नोव्हेंबर सकाळी सहा वाजल्यापासून कोकण किनारपट्टीवर सुरू होणार आहे. या मोहिमेअंतर्गत किनारपट्टी सील केली जाणार आहे. सिंधुदुर्गात वेंगुर्ले ते विजयदुर्ग या किनारपट्टी भागात 36 तास चालणार्‍या या सागर सुरक्षा कवच मोहिमेत रेड टीम ब्ल्यू टीमचे सुरक्षा कवच भेदण्यात यशस्वी होणार का? हे पाहावयास मिळणार आहे.

सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किनारपट्टी भागात दरवर्षी सागर सुरक्षा कवच मोहिम राबविण्यात येते. या मोहिमेत पोलिस दल, तटरक्षक दल, बंदर विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, गृहरक्षक दलाचे जवान सहभागी होतात. सकाळी सहा वाजल्यापासून या सागर सुरक्षा कवच मोहिमेस सुरवात होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. तीन पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान असे 50 हून अधिक कर्मचारी मोहिमेत सहभागी होणार आहेत.

सागरी सुरक्षा कवच मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर सागरी महामार्गासह मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. शिवाय समुद्रात दिवसा व रात्रीच्यावेळी गस्त घातली जाणार आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील वेंगुर्ले ते विजयदुर्ग या भागात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. रेड टीमला आपल्या हद्दीत घुसू न देण्यासाठी येथील ब्ल्यू टीम सज्ज झाली आहे. त्यामुळे 36 तास चालणार्‍या या मोहिमेत ब्ल्यू टीमची सुरक्षा कवच भेदण्यात रेड टीम यशस्वी होते का? हे पाहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या