
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवण बंदरातील खडकाळ भाग लक्षात घेता नौकानयन मार्ग सुलभ होण्यासाठी बंदर विभागाकडून बसवण्यात येणारी दिशादर्शक पिंपे
(समुद्री बोया) गेल्या वर्षी वाहून गेल्याने नौकानयन मार्ग धोकादायक बनला होता. दरम्यान याबाबत आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाचे लक्ष वेधताच आठ महिने रखडलेली दिशादर्शक पिंप बसवण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
मालवण बंदराच्या मार्गावर पाच दिशादर्शक पिंप बसवण्यात आली आहेत. कायमस्वरूपी ही पिंपे समुद्रात राहणार असून यावर मार्गदर्शक दिवेही बसवण्यात आले आहेत. अशी माहिती मालवण बंदर विभागाच्या वतीने देण्यात आली.
आठ महिने समुद्रात दिशादर्शक पिंपेच नाहीत
समुद्रात टाकण्यात येणारी दिशादर्शक लोखंडी पिंप बसवण्याची निविदा प्रक्रिया होऊन आठ महिन्याच्या कालावधी उलटला मात्र समुद्रात पिंपे बसवण्याची कार्यवाही झाली नाही. बंदर विभागाकडून याची कार्यवाही न झाल्याने रात्रीच्या वेळी बंदरात परतणाऱ्या मासेमारी नौका खडकांना आपटून अपघात स्थिती निर्माण झाली आहे. ही बाब मागील महिन्यात मच्छीमारांनी तसेच तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख बाबी जोगी यांनी आमदार नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार आमदार नाईक यांनी तात्काळ दिशादर्शक पिंपे बसवण्याची कार्यवाही करा. अश्या सूचना बंदर अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
मच्छिमारांचा मार्ग बनला सुलभ
पूर्वी बसवण्यात आलेली लोखंडी पिंपे पावसात वाहून गेली. त्यानंतर दिशादर्शक पिंप बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र अर्धा मासेमारी हंगाम संपला तरी दिशादर्शक न बसल्याने मच्छीमारातून नाराजी व्यक्त होत होती. मच्छीमारांची सततची मागणी व आमदारांच्या सुचनेनंतर रखडलेली प्रक्रिया गतिमान होत दिशादर्शक बसवण्यात आली आहेत. भरती ओहोटीच्या वेळी तसेच रात्रीच्या वेळी बंदरात परतणाऱ्या व सकाळी लवकर मासेमारीस निघणाऱ्या बोटींचा मार्ग सुलभ होणार आहे. याबाबत मच्छीमारातून समाधान व्यक्त करण्यात आले.

































































