मोटरसायकल अपघातात एकजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident-common-image

सामना प्रतिनिधी। मालवण

आचरा-मालवण मार्गावर ओझर रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या मोटरसायकल अपघातात राजेश अशोक सावंत (32) हा तरुण गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या राजेश याला मच्छिमार नेते कृष्णनाथ तांडेल व त्या मार्गावरून जाणाऱ्या रिक्षा व्यावसायिक भिवा शिरोडकर यांनी रिक्षातून उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. राजेश हा घुमडे ग्रामपंचायतीचा सदस्य असून माजी जि. प. अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा मुलगा आहे. त्याचा नेमका अपघात कसा झाला याची माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती.

अपघातानंतर राजेश रस्त्यावर पडल्याचे पाहून अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. यावेळी त्या मार्गावरून जात असलेल्या मच्छीमार नेते कृष्णनाथ तांडेल राजेशच्या मदतीसाठी पुढे आले. मात्र अन्य कोणीही राजेशच्या मदतीसाठी पुढे आले नाही. यावेळी त्या मार्गावरून भरड येथील रिक्षा व्यावसायिक भिवा शिरोडकर जात होते. तांडेल व शिरोडकर यांनी प्रसंगावधान दाखवत रिक्षामधून राजेश याला तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राजेश याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, डॉ. अजित लिमये यांनी तपासणी करत प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला रुग्णवाहिकेतून पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच राजकिय पदाधिकारी व मित्रमंडळींनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

राजेश याचा अपघात नेमका कसा झाला याबाबत उशिरापर्यंत माहिती उपलब्ध झाली नव्हती. घटनास्थळी गाडी रस्त्याच्या कडेला पडलेली होती. तसेच रस्त्यावर अपघाताच्या खाणाखुणाही दिसून येत होत्या. अपघातानंतर राजेश बराच काळ रस्त्यावर पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. दरम्यान अपघात स्थळी कोणीही मदतीस पुढे न आल्याने संताप व्यक्त होत आहे.