
मालवण शहरातील सागरी महामार्ग येथील कांदळवन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. प्लॅस्टिक व दारूच्या बॉटलचा कचऱ्यात सर्वाधिक समावेश दिसून आला आहे. पर्यावरण प्रेमींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, वनविभाग याची दखल घेत कारवाई करणार का? असा सवालही पर्यावरण व वृक्ष प्रेमींनी उपस्थिती केला आहे.
जागतिक पाणथळ भूमी दिनाच्या निमित्ताने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवणच्या नेचर क्लब मार्फत मालवण शहरातील सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रा. हसन खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सागरी महामार्गाच्या दुतर्फा पाणथळ जागांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा गोळा केला. यामध्ये नगरपालिकेच्या पाच गाड्या भरून कचरा तसेच मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.































































