मालवण किनारपट्टीवर घुसखोरी करणारे गुजरातमधील 6 ट्रॉलर्स पकडले

534

सिंधुदुर्गात जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात 20 वाव खोल समुद्रात अवैधरीत्या मासेमारी करणारे गुजरातमधील 6 ट्रॉलर्स मत्स्य विभागाने पकडले. सर्व ट्रॉलर्स मालवण बंदरात आणण्यात आले आहेत. ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आली असून गुरुवारी सकाळी मासळीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य परवाना अधिकारी श्रुतिका गावडे यांनी दिली.

गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्संनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मासळीची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याने मच्छीमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. यात गेल्या महिनाभरात अवैधरीत्या मासेमारी करणारे आठहून अधिक ट्रॉलर्स पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हायस्पीड ट्रॉलर्स पकडले जात असतानाही परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच राहिल्याने मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईची मोहिम अधिक तीव्र केली आहे.

सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य परवाना अधिकारी श्रुतिका गावडे यांच्यासह सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा, पोलिस कर्मचारीपावसकर, खोत, तांडेल नारायण हरचकर, अंकुश तोरसकर, राकेश नाटेकर यांचे पथक गस्तीनौकेद्वारे गस्त घालत असता त्यांना 20 वाव समुद्रात अनेक परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स अवैधरीत्या मासेमारी करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या पथकाने कारवाई करत गुजरात येथील सहा ट्रॉलर्स पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या