रत्नागिरीतील पर्ससीन ट्रॉलरवर कठोर कारवाईसाठी आमदार नाईक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवण समुद्रात सोमवारी पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या जाळ्या जप्त करण्याची तसेच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याच्या कारवाईचा प्रस्ताव तत्काळ तहसीलदारांकडे सादर करा अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक यांना दिल्या.

दरम्यान समुद्रात परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी होत असताना तुमचा भ्रमणध्वनी सातत्याने बंद असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत आमदार नाईक यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त महाडिक यांना सुनावले.

मालवण दौर्‍यावर आलेल्या आमदार नाईक यांनी मंगळवारी तहसीलदार समीर घारे यांची भेट घेत पर्ससीन ट्रॉलर्सवरील कारवाईबाबत चर्चा केली. यावेळी येथील समुद्रात पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर कडक कारवाई करण्यात यावी. संबंधित ट्रॉलर्संना ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारीचा परवाना असताना त्यांच्याकडे पर्ससीनच्या जाळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे या जाळ्या जप्त करण्याबरोबरच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याची कारवाई करा. यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ तहसीलदार यांच्याकडे सादर करा अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या. यासंदर्भात आमदार नाईक यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्त राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली.

दोन दिवसापूर्वी पळून गेलेल्या रत्नागिरीतील ट्रॉलर्सवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून कडक कारवाई न झाल्याने आमदार नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परराज्यातील ट्रॉलर्स पकडून देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईमुळे आमचे कार्यकर्ते बदनाम होत असल्याचे स्पष्ट केले. या ट्रॉलरविरोधात पुन्हा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार द्यावी अशी सूचना त्यांनी महाडिक यांना दिली.