मालवणात चोरीचे सत्र सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवण तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. कातवड गावात चार दिवसांपूर्वी घरफोडी करून तीस तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (३१) पेंडूर सोनारवाडी येथील सरीता शिवाजी वारंग या 70 वर्षीय महिलेच्या बंद घरात चोरी झाली आहे. घरातील पत्र्याच्या पेटीची कडी उचकटून आतील सोन्याचे दागिने व रोख अडीच हजार रुपये असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना उघडकीस आली.

या प्रकरणी कट्टा पोलिस दूरक्षेत्रात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
पेंडूर सोनारवाडी येथे सरीता वारंग या वास्तव्यास आहे. सध्या भात कापणीचा हंगाम असल्याने त्या दररोज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घराला केवळ कडी लावून भात कापणीच्या कामास जातात. तर सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान येतात.

बुधवारी सायंकाळी त्यांना घरातील पत्र्याच्या पेटीची कडी उचकटलेली दिसून आली. यात पेटीचे कुलूप तसेच होते. त्यांनी पेटी तपासली असता आतील अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, एक अंगठी, नथ व रोख अडीच हजार रुपये गायब झाल्याचे दिसून आले. या चोरीची माहिती त्यांनी कट्टा पोलीस दूरक्षेत्रच्या पोलिसांनी दिली असता पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, कट्टा दूरक्षेत्रचे रुक्मांगत मुंडे, स्वप्नील तांबे, मंगेश माने, हर्षल खडपकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. कट्टा दूरक्षेत्रात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.