मालवणात दोन दिवसात तब्बल 390 मिलिमीटर पाऊस; अनेक ठिकाणी पडझड, शेती पाण्याखाली

703

मालवणात मुसळधार पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. शनिवारी सकाळी काहीशी उसंत घेतलेला पाऊस दुपार नंतर मुसळधार बरसला. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. दोन दिवसात तब्बल 390 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आचरा हिर्लेवाडी येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले. चिंदर गावठणवडी येथे दत्ताराम कदम यांच्या घराचा काही भाग कोसळून नुकसान झाले. मालवण शहरात गुरुनाथ धुरी यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. नुकसानीची नोंद तालुका आपत्ती विभागाकडे करण्यात आली आहे. अन्य काही ठिकाणीही पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

समुद्रही खवळला असून जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात पाणी शिरले आहे. मसुरे, आचरा येथील खाडी किनारी भागास मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. तर पुलही पाण्याखाली गेल्याचे चित्र खोटले गावात होते. चाफेखोल-कुंणकावळे मार्गावर मोरीला भगदाड पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली. तहसील प्रशासनाने माहिती देताच जिप बांधकाम विभाग घटनास्थळी पोहचला होता.

कोरोना आपत्तीकाळ असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने जिल्ह्यात 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून उदोग व्यवसाय, शाळा-कॉलेज बंदच आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक घरीच असल्याने पावसाचा तसा परिणाम जनजीवन विस्कळीत होण्यावर झाला नाही. ज्या ठिकाणी पडझड झाली, पाणी भरले तेथे मदतकार्य हाती घेण्यात आले. तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवून मदतकार्यासाठी तत्पर आहेत.

वाढत्या पाण्याचा बेटांना धोका
मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्याने किनारपट्टी भागात पाणी घुसत आहे. कालावल खाडी पात्रात खोत जुवा, मसुरकर जुवा अशी बेटे असून त्यावर लोकवस्ती आहे. शुक्रवारी दोन्ही बेटांवर काही प्रमाणात पाणी घुसले होते. पावसाचा जोर असाच वाढल्यास बेटांवर पाणी घुसून घरांना पाण्याचा वेढा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या