भव्य शोभायात्रेने मालवण नगरी दणाणली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवण नगरपरिषद शतक मोहोत्सव निमित्ताने मालवण शहरातून गुरुवारी सायंकाळी ढोल ताश्याच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेने मालवण नगरी दणाणून गेली. आकर्षक चित्ररथ व विविध वेशभूषा यावेळी साकारण्यात आल्या.

आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, मुख्याधिकारी रंजना गगे, विरोधी पक्षनेते मंदार केणी
यांच्यासह सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शोभायात्रेच्या निमित्ताने चित्ररथ स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. चित्ररथ स्पर्धेतील प्रथम विजेत्या चित्ररथास 15 हजार रुपये तर द्वितीय विजेत्यास 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे याशिवाय दोन गटात घेण्यात येणाऱ्या वेशभूषा स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या तीन क्रमांकाना अनुक्रमे तीन हजार,दोन हजार आणि एक हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे ही वेशभूषा स्पर्धा 14 वर्षा खालील आणि 14 वर्षावरील अशा दोन गटात होणार आहे.

25 ते 27 जानेवारी या कालावधीत टोपीवाला बोर्डिंग मैदानावर कॉमेडी स्टार भाऊ कदम, सुप्रिया पठारे यांच्यासह सिनेस्टार, टीव्ही स्टार यांचे विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. तर ‘खेळ पैठणीचा’ आणि शतकोत्सव सुंदरी या विशेष कार्यक्रमांचा आस्वादही जिल्हा वासीयांसह व पर्यटकांना घेता येणार आहे. स्थानिक कलाकारांचे दर्जेदार कार्यक्रम, नामांकित स्टार गायकांचा ऑर्केस्ट्रा, पाककला स्पर्धा या बरोबर फूड स्टॉल मधून मालवणी खाद्य मेजवानीही असणार आहे. “मालवण आपलाच आसा… महोत्सवाक येवकच व्हया” असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व मालवण नगरपरिषद यांनी केले आहे.