चक्रीवादळाचा मालवण किनारपट्टीला ‘तडाखा’, शहरात घुसले पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा शुक्रवारी सकाळी सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागास बसला आहे. सोसाट्याचा वारा व धडकणाऱ्या जोरदार सागरी लाटांनी मालवण किनारपट्टीरी हादरून गेली. पहाटेपासून उधाणाच्या लाटांचे पाणी मालवण शहर किनारपट्टी, मेढा राजकोट, आचर्‍यातील जामडूल बेट, देवबाग येथील वस्तीत घुसले. शहरातील बंदर जेटी, मोरेश्‍वरवाडी, दांडी, तळाशील, तारकर्ली किनारपट्टी भागालाही उधाणाचा जोरदार फटका बसला.

दरम्यान, काही पर्यटन व्यावसायिक, मच्छीमारांच्या होड्या, इंजिन, जाळी उधाणाच्या तडाख्यात वाहून गेली आहेत. पर्यटन व्यवसाईकांचेही मोठे नुकसान झाले आहे. देवबाग सुनामी आयलंड येथील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाईकांचे तंबू कर्ली खाडीच्या उधानात वाहून गेले. देवबाग येथे अनेक घरांना पाण्याने वेढा दिला. घरात व पर्यटन रूम मध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने किनारपट्टी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. पडझडीच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक भागातील बत्ती सकाळ पासून गुल होती.

समुद्री उधाणाचे पाणी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत घुसून हनुमान मंदिरपर्यत पोचले आहे. अजस्र लाटांचा मारा तटबंदीस होत आहे. प्रवेशद्वारावरील जेटी खचली. त्यामुळे किल्ला रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. १९६५ च्या चक्री वादळांची आठवण झाल्याचे काही जेष्ठ व्यक्तींनी सांगितले. शहरातील मेढा राजकोट येथील किनार्‍यालगत असलेल्या वस्त्यांमध्ये सकाळी उधाणाचे पाणी घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. काही मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी नेल्या होत्या. यात दांडी समुद्रात काहीजणांनी समुद्रात ठेवलेले ट्रॉलर्स व छोट्या नौकांना धोका निर्माण झाल्याचे दिसून आले. यात काही छोट्या होड्या समुद्रात वाहून गेल्याचे दिसले. समुद्राचे अक्राळविक्राळ रुपामुळे किनारपट्टी भागात हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. मेढा राजकोटमधील मच्छीमारांनी समुद्रातील आपल्या नौका किनार्‍यावर ओढण्यास सुरवात केली आहे. यात काही मच्छीमारांच्या नौका आदळून नुकसानही झाले आहे. वायरी भुतनाथ मोरेश्‍वरवाडीत समुद्री उधाणाचे पाणी घुसले आहे. मासळी मंडईत घुसल्याचे दिसून आले.

देवबाग येथे घरांना पाण्याचा वेढा…

किनार्‍यालगत लाटांचा जोरदार मारा सुरू होता. दांडी, तळाशील, देवबाग वस्तीपर्यत समुद्री लाटांचे पाणी घुसल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. देवबाग येथे थेट वस्तीत पाणी घुसून काहींच्या घरात पाणी गेले. देवबाग ख्रिश्चनवाडी, मोंडकरवाडी, भांजीवाडी, श्रीकृष्णवाडी, मोबार यासह अन्य भागात पाणी अधिकच घुसले. बंधारा पूर्णपणे कोसळला आहे. किनार्यवारील पर्यटन व्यवसाईकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी

मालवण-देवबाग किनारपट्टी भागात चक्री वादळाने केलेल्या नुकसानीची माहिती मिळताच विजयी जल्लोष बाजूला ठेवत आमदार वैभव नाईक मालवण येथे दाखल झाले. नुकसानीची माहिती घेत प्रशासनास नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या. वादळाची स्थिती लक्षात घेता प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अश्या सूचना तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना करण्यात आल्या.

वादळ धडकले मात्र धोक्याचा बावटा कागदावर

किनारपट्टी भागात धडकणार्या वादळाची पूर्व सूचना देणारा धोकाचा 3 नंबर बावटा लावण्यात यावा. यासह वादळाची माहिती देणारा संदेश बंदर विभागाच्या वरिष्ठ कार्यालायातून मालवण बंदर विभागास गुरुवार 24 रोजी प्राप्त झाला. जिल्हा प्रशासनाकडूनही लेखी पत्र आले. मात्र मालवण राजकोट येथील धोक्याचा बावटा उभारणारी यंत्रणा नादुरुस्त झाल्याने वादळ धडकले तरी बंदर विभागास बावटा लावता आला नाही. याबाबत होडी वाहतूक संघटना व मच्छिमार यांनी संताप व्यक्त केला. अनेकांना अचानक होड्या समुद्रा बाहेर घेताना अडचणी येत होत्या. काही होडीत पाणी घुसले. बंदर विभागाच्या कारभारा बाबत किल्ला होडी संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.