मुसळधार पावसात मालवणातील पुरातन मंदिर कोसळले

503

दोन दिवस काहीशा विश्रांतीनंतर मंगळवारी (७ जुलै) मुसळधार पावसाने तालुक्यास झोडपून काढले. पावसामुळे नद्या, नाले दुधडी भरून वाहत होत्या. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी पडझड होऊन नुकसानीच्या घटनाही घडल्या. शहरातील मेढा येथील पुरातन नाभनाथ मंदिर मुसळधार पावसात कोसळले.

हवामान विभागाने ११ जुलै पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर समुद्रही खवळलेला राहील असे सांगितले होते. त्यानुसार पावसाचा जोर दिवसभर दिसून आला. समुद्राच्या अजस्र लाटांचा तडाखा किनारपट्टी भागात सुरू होता. नद्या, नाल्यांना पूर आल्याने अनेक मुख्य रस्ते काही ठिकाणी पाण्याखाली गेले होते. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.

तळगाव पेडवेवाडी येथील संदीप चंद्रकांत दळवी यांच्या घराची पडझड होऊन सुमारे आठ हजाराचे नुकसान झाले. तळगाव शेळवणेवाडी येथील अरुण साळगावकर यांच्या घराचेही पडझड होऊन नुकसान झाले. साळेल येथील सहदेव आचरेकर यांच्या घरावर रतांब्याचे झाड पडून १४०० रुपयांचे नुकसान झाले. कोळंंब न्हिवे येथील स्वप्नील परब यांच्या राहत्या घरावर फणसाचे झाड पडून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. कुणकवळे येथील सूर्यकांत निकम यांच्या राहत्या घरावर दुपारी सागाच्या झाडाची फांदी पडून १५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने घटनास्थळी जात नुकसानीची पंचयादी केली आहे.

पुरातन मंदिर कोसळले

मुसळधार पावसाच्या तडाख्यात शहरातील मेढा येथील पुरातन नाभनाथ मंदिर कोसळल्याची घटना घडली आहे. हे पुरातन मंदिर जीर्ण झाले होते. दुपारी मुसळधार पावसात ते कोसळले. जेसीबीच्या साहाय्याने मंदिराचे जीर्ण अवशेष हटविण्याचे काम सुरू होते. वाऱ्यासह पावसाचा जोर कायम होता.

आपली प्रतिक्रिया द्या