
मालवण चौके येथील भगवती पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल घेऊन येणाऱ्या टॅंकरचा गुरुवार 30 जुलै मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सावरवाड येथे अपघात झाला. टँकरचा टायर फुटल्याने रस्त्याच्या बाजूला पलटी झालेल्या टँकरचा मोठा स्फोट झाला व टँकरने पेट घेतला. टँकर पलटी होताच चालक व क्लिनर बाहेर पडल्याने ते सुदैवाने बचावले आहेत. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचे ग्रामस्थ जमा झाले. मालवण पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मालवण नगरपालिका अग्निशमन यंत्रणा बंद असल्याने कुडाळ एमआयडीसी येथून अग्निशमन गाड्या बोलावण्यात आल्या. मात्र तोपर्यंत टँकर बहुतांशपणे जळून गेला होता. टँकरमध्ये 3 हजार लिटर पेट्रोल व 6 हजार लिटर डिझेल असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी शुक्रवारी सकाळी दिली.
चौके येथील भगवती पेट्रोलिअमचा असलेला हा टॅंकर नेहमीप्रमाणे सांगलीहून पेट्रोल आणि डिझेल घेऊन येताना मालवण सावरवाड गणेश मंदिर येथे आला असता हा अपघात झाला.अपघात बाबत माहिती मिळताच मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मालवण पोलिसांनी मालवण पालिकेशी संपर्क साधला मात्र नवी अग्निशमन गाडी बंद असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन यंत्रणेला माहिती देण्यात आली.
अग्निशमन अधिकारी जे. आर. तडवी, प्रमुख अग्निशमन विमोचक व्ही. के. राणे, चालक यंत्र चालक ए. एस. डीचवलकर, व्ही. टी. शिंदे, एस. के. जाधव, एस एल. पाटील, अग्निशमन विमोचक डी.एस. दळवी आदी अग्निशमन यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात आली. मात्र पेट्रोल, डिझेलसह टँकर जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, भगवती पेट्रोल पंपच्या वतीने अपघात व नुकसान बाबत शुक्रवारी मालवण पोलीस ठाण्यात खबर नोंद करण्याची कार्यवाही करण्यात आली.






























































