
ऑस्कर पुरस्कार सोहळय़ासाठी यंदा हिंदुस्थानातून कोणत्या चित्रपटाची निवड होणार याकडे साऱयांचे लक्ष लागले होते. ज्युड अँथनी जोसेफ दिग्दर्शित ‘2018-एव्हरीवन इज अ हीरो’ या मल्याळम चित्रपटाची हिंदुस्थानातून अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 10 मार्च 2024 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.
‘2018-एव्हरीवन इज अ हीरो’ या चित्रपटाचे कथानक 2018 मध्ये केरळ येथे झालेल्या पूरस्थितीवर आधारित आहे. या काळात लोक या भीषण नैसर्गिक आपत्तीला धैर्याने कसे तोंड देतात याची कहाणी चित्रपटात अतिशय सुंदररीत्या मांडण्यात आली आहे. टोविनो थॉमस, पुंचाको बोबन, आसिफ अली, अपर्णा बालमुरली आदी यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असून याच वर्षी 5 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. आता थेट ऑस्करमध्ये या चित्रपटाने मजल मारली आहे.
ऑस्करसाठी प्रवेशिका म्हणून हिंदुस्थानकडून 22 चित्रपट शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. यामध्ये ‘द केरळ स्टोरी’, ‘गदर-2’, ‘झ्विगाटो’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, ‘घूमर’ आणि ‘वाळवी’ या चित्रपटांचा समावेश होता.
























































