
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममतादीदींनी त्यांचा सामना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशीच असल्याप्रमाणे प्रचार सुरू ठेवला आहे. शुक्रवारी झालेल्या एका सभेत तर ममता बॅनर्जी यांनी, येथे उद्योगविश्काचा विकास थांबला आहे. फक्त त्यांची दाढी वाढतेय, असा खोचक टोला पंतप्रधान मोदींना लगावला.
कधी ते स्वतःला स्वामी विवेकानंद म्हणवून घेतात, तर कधी स्टेडियमला स्वतःचं नाव देतात. त्यांच्या डोक्यात काही तरी बिघाड झाला असून स्कू ढिला झालाय असं वाटतंय, अशा शब्दांत तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ते सगळ्यांना चोर म्हणतात, पण स्वतः ते डाकूंचे सरदार आहेत. भाजप काय करतेय? नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? असा सवाल त्यांनी केला.
ममतांचेही हिंदू कार्ड
निवडणुकीच्या पहिल्या टप्पात प्रचारादरम्यान हिंदू मंदिरांमध्ये जात दर्शन घेणाऱया मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी हिंदू कार्ड बाहेर काढले आहे. मला हिंदू धर्म शिकवत आहेत. मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी आहे. तुमच्यापेक्षा जास्त हिंदू धर्म जाणते. माझ्यासाठी सर्व समान आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक समान आहेत, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधलाय.





























































