
संथाल परिषदेच्या स्थळात बदल आणि कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून पश्चिम बंगाल सरकारवर नाराजी व्यक्त करणाऱया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार उत्तर दिले. ‘निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या इशाऱयावर राजकारण करू नका,’ असा खोचक सल्ला ममतांनी राष्ट्रपतींना दिला.
नवव्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेसाठी राष्ट्रपती आज पश्चिम बंगाल दौऱयावर होत्या. एसआयआरविरोधात कोलकात्यात आंदोलन करणाऱया ममता बॅनर्जी या परिषदेला अनुपस्थित होत्या. तसेच परिषदेचे ठिकाण बदलल्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. ठिकाण बदलल्यामुळे संथाल बांधवांची गैरसोय झाल्याची टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याला ममतांनी प्रत्युत्तर दिले. ‘राष्ट्रपतींनी कधी अल्पसंख्याकांचा विचार केला नाही. एससी, बौद्ध, पंजाबी, जैन, पारसी आणि हिंदूंबद्दलही कधी त्या बोलल्या नाहीत. त्यांना राजकारण बरोबर कळतं,’ असा टोला ममतांनी हाणला. ‘आदिवासींसाठी आम्ही काय केलं याची यादी आम्ही देऊ शकतो. त्यामुळे बंगालवर टिप्पणी करण्याआधी भाजपशासित राज्यातील परिस्थितीकडेही बघा. फक्त एका पक्षाचे ऐकून टीकाटिप्पणी करणे योग्य नाही,’ असेही ममतांनी सुनावले.
पुनः पुन्हा याल तर आम्ही काय करायचे?
राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यावरून होणाऱ्या टीकेलाही ममतांनी उत्तर दिले. ‘राष्ट्रपती वर्षातून एखाद्या वेळेस येत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. पण निवडणूक काळात त्या पुनः पुन्हा येत असतील तर प्रत्येक वेळी त्यांच्या कार्यक्रमाला कसे जाणार? म्ख्युमंत्री म्हणून मलाही अनेक कामे असतात. आम्ही प्रत्येक वेळी राष्ट्रपतींच्या मागे फिरत राहावे असे अपेक्षित आहे का,’ असा सवाल ममतांनी केला.
























































