जर ते ४२० असतील तर, मी ४४० व्होल्ट आहे; ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदार याद्यांच्या पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “जर ते ४२० असतील, तर मी ४४० व्होल्ट आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. निवडणूक आयोगाचे काम सध्या ‘टॉर्चर कमिशन’सारखे सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रकारांशी संवाद साधताना त्या असे म्हणाल्या आहेत.

निवडणूक आयोगावर ‘टॉर्चर कमिशन’चा शिक्का मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, “निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिला नसून, तो केवळ छळ करण्याचे केंद्र बनला आहे. अधिकारी लोकांना घरी जाऊन धमकावत आहेत आणि कागदपत्रांच्या नावाखाली छळ करत आहेत.”

हिंदुस्थानच्या संघराज्य रचनेत स्वायत्त संस्थांनी निष्पक्ष राहणे गरजेचे आहे, मात्र निवडणूक आयोग एका बाजूने झुकून काम करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. बंगालमधील जनतेच्या मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊन संघर्ष करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.