उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये महिला अत्याचार वाढले म्हणून बंगालमध्ये मोदी-शहा नको! ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल

देशभरात जिथे  भाजपचे सरकार आहे त्या त्या उत्तर प्रदेश ,गुजरात ,आणि बिहारमध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. गुजरातमध्ये तर महिला अत्याचाराने कहर गाठला आहे. म्हणूनच आम्हाला पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील सरकार नकोय ,असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केला आहे. ममता यांनी कोलकाता शहरात काढलेल्या पदयात्रेत भाजपशासित राज्यांत वाढणाऱया गुन्हेगारीवर जोरदार शरसंधान केले.

कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड मैदानातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या महारॅलीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकाता शहरात पदयात्रा काढून मतदारांशी थेट संपर्क साधला. पदयात्रेत आपल्या गळ्यात ‘जय बांगला’चे पोस्टर लटकावत फिरणाऱया ममता यांनी भाजपच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला.

 जागतिक महिला दिनी ममतांचा ‘कोलकाता मार्च’

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकाता शहरात साडेचार किमी लांबीचा ‘कोलकाता मार्च’ आयोजित केला होता याप्रसंगी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर जोरदार टीकास्त्र सोडले.कालच सिलिगुडी येथील महिला पदयात्रेत ममता यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या प्रचंड भाववाढीचा निषेध करण्यासाठी गॅस सिलिंडर्सचे फलक घेऊन मोठा मार्च काढला होता.

  • ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीसाठीचा आपला उमेदवारी अर्ज नंदिग्राममधून 10 मार्चला भरणार आहेत.  तृणमूलमधून बाहेर पडून भाजपचा हात धरलेले शुभेन्दू अधिकारी 12 मार्चला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधीच जाहीर सभा घेऊन ममता आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या