
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सडेतोड उत्तर दिले असून भाजप सरकार सर्वात मोठा लुटारू पक्ष असल्याची सणसणाटी टीका केली आहे. नोटबंदीपासून ते बँकबंदीपर्यंत देशातील सामान्य नागरिकांना केवळ लुटण्याचे काम भाजपने केल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला.
ममता बॅनर्जी यांनी हल्दिया येथे सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी भाजपवर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालची सत्ता भाजपला मिळता कामा नये, दंगलीचे षड्यंत्र रचणे, हत्या करणे, दलित महिलांचे शोषण करणे अशा प्रकरणांमध्ये भाजपचे नाव वारंवार येत असते.
बंगाली नागरिकांना दंगामुक्त राज्य हवे आहे. बंगालमध्ये शांतता नांदावी, असे वाटत असल्यास भाजपला मत देऊ नका, असे आवाहन ममता दीदींनी यावेळी केले. तर बंगालमध्ये विकास झाला नाही, अशी टीका भाजपवाले करतात त्यास प्रतिप्रश्न करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मग तुम्ही दिल्लीत काय केले?
बंगालमध्ये विकास झाला नाही, अशी टीका भाजपवाले करत आहेत. मग दिल्लीत तुम्ही काय केले, असा प्रतिप्रश्न ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला.
यावेळी शुभेंदू अधिकारी यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आता मला बरे वाटत आहे. आम्ही वाचलो, असा टोला त्यांनी यावेळी लगाविला.




























































