
डिलिव्हरी होत असताना एमआयसीयूमध्ये डॉक्टर झोपले होते… नवजात अर्भकाला ट्रेमध्ये घेऊन वॉर्डबॉय दोन मजले धावला… बाळंतपणानंतर बेडवर झालेली घाण रुग्णांच्या नातेवाईकांना साफ करायला लावली… रक्ताने माखलेल्या चादरीवर पेशंटला दोन दिवस ठेवले… बाळंतीण महिलेला दोन खाटांच्या मध्ये टबमध्ये बसवून आंघोळ करायला लावली, पूर्ण रिपोर्ट आले नसताना किमोचे उपचार दिले…
चेंबूरचे रहिवाशी किरण पाटील यांनी केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर हे धक्कादायक आरोप केले आहेत. केईएमच्या डॉक्टरांनी माझा व माझ्या पत्नीचा छळ केला. आम्हाला धमक्या दिल्या. या नरकयातनांना कंटाळून आम्ही डामा डिस्चार्ज घेतला आणि काही दिवसांतच माझी पत्नी सोडून गेली. यमालाही लाजवेल असा आमचा छळ करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
किरण पाटील यांनी 4 जानेवारी 2025 रोजी पत्नी तेजस्विनी हिला केईएममध्ये दाखल केले. गर्भवती असलेल्या तेजस्विनीला कॅन्सरची लक्षणे होती. त्यामुळे अॅडमिट करतानाच डॉक्टरांनी पाटील यांना घाबरवले. पेशंट सीरियस असतानाही डॉक्टरांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. डिलिव्हरीच्या वेळी रुग्ण किंचाळत असताना एमआयसीयू वॉर्डमध्ये कोणी नव्हते. ऑन डय़ुटी असलेले डॉ. प्रथमेश झोपले होते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन वॉर्डबॉय इनक्युबेटर शोधत धावत होता. यात बाळाच्या जिवाला धोका होण्याची शक्यता होती. डिलिव्हरीनंतर पेशंटच्या पोटातील घाण कुटुंबीयांना साफ करायला लावली. पेशंटला दोन बेडच्या मध्ये बाथ टबमध्ये बसवून आंघोळ घातली. डॉ. कल्पिता यांनी बळजबरीने हे सगळे करायला लावले, असा दावा पाटील यांनी केला.
रक्ताच्या चाचणीसाठी चुकीचे सॅम्पल दिले!
बोन मॅरो टेस्टचे पूर्ण रिपोर्ट आले नसताना डिलिव्हरीच्या दिवशीच डॉक्टरांनी तेजस्विनीला किमोचे डोस दिले. लगेच हे उपचार करू नका, अशी विनवणी करूनही त्यांनी ऐकले नाही. तेजस्विनी यांच्या ब्लड टेस्टसाठी दुसऱ्याच रुग्णाचे ब्लड पाठवले गेले. खुद्द लॅबच्या कर्मचाऱ्यांनी हे कबूल केल्याचा दावा किरण पाटील यांनी केला आहे. ज्या टेस्टसाठी रक्त पाठवण्याची गरज आहे. त्यासाठी लघवी पाठवली गेली. रक्तदानासाठी डॉ. राकेश यांनी आम्हाला धमकावले, अशी व्यथा पाटील यांनी मांडली.
केईएमचे म्हणणे काय?
किरण पाटील यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांसह सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीला केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी लेखी उत्तर दिले आहे. तेजस्विनी यांच्यावर योग्य ते उपचार केले गेले. आर्थिक मदतीसाठी त्यांना सरकारी योजनांची माहिती दिली गेली. उपचाराबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना वेळोवेळी नातलगांशी चर्चा करण्यात आली होती, असे रावत यांनी म्हटले आहे.