
सामना प्रतिनिधी । मुंबई
कर्ज फेडायला पैसे हवे म्हणून अवघ्या एक लाखासाठी पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. आठ तासात आरोपीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मुलाची सुटका केली.
साकीनाकाच्या काजूपाडा परिसरातल्या जरीमरी येथे एका चाळीत असलेल्या गारमेंटमध्ये शाकिर सुलेमान शेख (38) हा कामाला आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचा पाच वर्षांचा मुलगा घराबाहेरून अचानक गायब झाला. त्यांनी परिसरात शोधशोध केली, पण त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास शेखला एक निनावी फोन आला आणि तुझा मुलगा माझ्या ताब्यात आहे. तो जिवंत हवा असेल तर एक लाख रुपये दे अशी मागणी कॉलर करू लागला. मुलाचे अपहरण झाल्याचे स्पष्ट होताच शाकिरने साकीनाका पोलीस ठाणे गाठले. याची तत्काळ गंभीर दखल घेत एसीपी मिलिंद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील माने व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. शाकिरच्या घरापासून दोन किमीच्या अंतरावर राहणारा अक्रम खान (19)यानेच मुलाचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले.
प्रेयसीच्या मैत्रिणीच्या घरी ठेवले लपवून
हातगाडीवर मोसंबी ज्युसचा धंदा करणार्या अक्रमने मुलाचे अपहरण करून त्याला प्रेयसीच्या मैत्रीच्या घरी लपवून ठेवले होते. अक्रम हाती आल्यानंतर पोलिसांनी मुलाची देखील सुटका केली. चौकशीत अक्रमने गुह्याची कबुली दिली. एका खासगी व्यक्तीकडून एक लाखाचे कर्ज घेतले होते. त्याचे पैसे परत फेडायचे होते. त्यासाठी एक लाख हवे म्हणून मुलाचे अपहरण करण्याचा विचार डोक्यात आला. त्यामुळे शाकिर शेखच्या मुलालाच टार्गेट करायचे ठरवून त्याचे अपहरण केल्याचे त्याने सांगितले.





























































