
महिला फिजियोथेरपिस्टना गुप्तांगाच्या नसेची तक्रार असल्याचे सांगत त्यांच्या समोर कपडे उतरवणाऱ्या एका विकृत व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या विकृताने न्हावा शेवा, माहिम, डिएन नगर, पिंपरी चिंचवड येथील महिला फिजियोथेरपिस्ट डॉक्टरांसमोर व्हिडीओ कॉलवर हे अश्लील कृत्य केले आहे.
मूत्राशयाचा डॉक्टर असल्याचे भासवायचा
सदर विकृत सुरुवातीला मूत्राशय विकारतज्ज्ञ असल्याचे सांगून त्या महिला फिजियोथेरपिस्टशी त्या काम करत असलेल्या रुग्णालयातील क्रमांकावर संपर्क साधायचा. त्यावेळी तो त्याच्या एका रुग्णाला गुप्तांगाच्या नसेचा त्रास असून त्यासाठी काही व्यायाम दाखवा असे त्यांना सांगायचा. त्यानंतर तो स्वत: त्यांच्याकडे रुग्ण म्हणून जायचा. एकदा डॉक्टरशी भेट झाली की त्यांच्याकडून व्यायाम प्रकार जाणून घ्यायचा. डॉक्टरची भेट झाल्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवायचा व त्यानंतर काही दिवसांनी त्यांना व्हिडीओ कॉल करायचा. या व्हिडीओ कॉलमध्ये तो नग्न होत त्याचे गुप्तांग दाखवत त्यांच्या व्यायामाने काहीच फरक पडला नसल्याचे सांगायचा. असा प्रकार त्याने चार डॉक्टरांसोबत केला असून त्या सर्वांनी त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
सतत बदलत होता लोकेशन
डॉक्टरला फोन केल्यानंतर तो बरेच दिवस त्याचा फोन बंद ठेवायचा. तसेच स्वत:चे लोकेशन देखील सतत बदलायचा. त्यामुळे पोलिसांना त्याला पकडणे कठिण जात होते. पण 15 डिसेंबरला नवी मुंबई पोलिसांना तपासात समजले की तो मोबाईल नंबर वापरत असलेल्या व्यक्तीने मुंबई ते कोलकाता असा प्रवास केला व नंतर दुसऱ्या दिवशी तो उल्वे येथे आला. त्यानंतर त्यावरून पोलिसांनी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला व्यक्ती व विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीची ओळख शोधून काढली. त्यावरून त्यांना त्याचा पत्ता सापडला व त्यांनी त्या विकृताच्या मुसक्या आवळल्या.
































































