व्यायामाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या फिटनेस ट्रेनरला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वजन कमी होण्यासाठी व्यायाम शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या फिटनेस ट्रेनरला बेड्या पडल्या आहेत. राहुल परदेशी (29) असं या ट्रेनरचं नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्या हातातल्या चांदीच्या ब्रेसलेटमुळे त्याची ओळख पटवणं पोलिसांना सहज शक्य झालं.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल हा महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात हा फिटनेस ट्रेनर फ्रीलान्स तत्वावर ट्रेनिंग देतो. सोमवारी पीडित मुलगी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान जॉगिंगसाठी रेसकोर्समध्ये आली. साडे सहा वाजता राहुल तिला भेटला आणि वजन कमी करण्यासाठी त्याने तिला काही व्यायाम प्रकार शिकवले. पण ते व्यायाम शिकवत असताना त्याने तिला चुकीच्या पद्घतीने स्पर्श केला. घरी गेल्यानंतर पीडितेने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी त्वरित ताडदेव पोलिसांत तक्रार दाखल केली.

रेसकोर्स परिसरात राहुलसारखेच अन्यही काही फिटनेस ट्रेनर असल्याने राहुलची ओळख पटत नव्हती. तेव्हा पीडितेने राहुलच्या हातातल्या चांदीच्या ब्रेसलेटविषयी माहिती दिली. सुदैवाने ताडदेव पोलीस स्टेशनमधल्या एका अधिकाऱ्याला राहुलला ओळखत असल्याचं आठवलं. 2015मध्ये राहुल आणि त्याच्या भावात झालेला वाद सोडवतेवेळी अधिकाऱ्याला त्याच्या हातातलं ब्रेसलेट लक्षात होतं. त्यावरून राहुलची ओळख पटवली आणि त्याला पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आली.