
दानपेटी, 15 मोबाईल, दुचाकी हस्तगत
मशिदीमध्ये जाऊन दानपेटी व मोबाईल चोरणारा एक अट्टल चोरटा रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेली दानपेटी, 15 मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे. हुसैन आरिफ साजीद हुसैन सय्यद (42) असे त्या चोरटय़ाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांत रफी अहमद किडवाई मार्ग परिसरात मशिदीमध्ये चोरीच्या तीन घटना घडल्या. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा फोटो मिळवून परिसरातील नागरिकांमध्ये पसरवून अशी व्यक्ती दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलीस गस्त घालत असताना नॅशनल मार्केटजवळ नागरिकांनी एका चोराला पकडले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन सय्यद याला ताब्यात घेतले. त्याने मशिदींमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत मशिदींत चोरी केल्याचे दहा गुन्हे दाखल आहेत.


























































