पॉलिशसाठी दिलेले सोने चोरणारा गजाआड

सामना प्रतिनिधी । मुंबई

पायधुनी येथील एका सराफाने पॉलिश करण्यासाठी दिलेले तीन लाख ८० हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळालेल्या पॉलिश करणाऱ्या चोरटय़ाला कोलकाताला पळण्याच्या तयारीत असतानाच पायधुनी पोलिसांनी दागिन्यांसह पकडले.

पायधुनीच्या चंदन स्ट्रीटवर अनिल धावा यांचा सोन्याचे/ हिऱयाचे दागिने बनवून देण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्याकडील तीन लाख ८० हजार किमतीचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी राजेश शेख (२४) याच्याकडे दिले होते. अनिल हे नियमितपणे शेखकडे दागिने पॉलिश करण्यासाठी द्यायचे. मात्र यावेळी शेखची नियत फिरली. त्याने सर्व दागिने घेऊन पळ काढला. अनिल धावा यांनी पायधुनी पोलिसात चोरीची तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानडे, पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण फडतरे, लीलाधर पाटील, अंमलदार सोलकर, शिंदे, दळवी, सावंत, सूर्यवंशी, ठाकूर या पथकाने राजेश शेख याचा शोध सुरू केला. दरम्यान, पायधुनी परिसरातील दुसरा भोईवाडा येथे एका सराफाकडे दागिने विकण्यासाठी राजेश येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांना त्याला पकडले.