
राज्यभरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या राशीन येथील तुकाईदेवीची विटंबना करण्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सर्व व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पाळला.
विनय मेघराज बजाज (रा. राशीन, ता. कर्जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विनय बजाज याने दर्शन रांगेतून न येता विरुद्ध दिशेने मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. तुकाई देवीला हातवारे करून चुकीच्या पद्धतीने बोलून, विटंबना करून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. ही घटना समजताच राशीनमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी तीव्र शब्दांमध्ये घटनेचा निषेध करून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
याबाबत ऍड. सचिन रेणूकर आणि ऍड. प्रतिभा सचिन रेणूकर (रा. जगदंबा मंदिराशेजारी, राशीन, ता. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनय बजाज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, पोलीस अंमलदार मारुती काळे, तुळशीदास सातपुते, संपत शिंदे यांनी आरोपीला तत्काळ अटक केली.
दरम्यान, गुरुवारी तुकाई देवी मंदिरामध्ये भाविकांच्या वतीने विधिवत महाभिषेक करून देवीची पूजा करण्यात आली. दिवसभर नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळला.
आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. यामुळे लोकभावना दुखावल्या गेल्या आहेत. आरोपीला लवकर जामीन होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतच. मात्र, त्याच्या तडीपारीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत.

























































