गावात परतल्यावर कोरोना चाचणी केली नाही, चुलत भावांकडून तरुणाची हत्या

दिल्लीहून उत्तर प्रदेशमधील गावी परतल्यानंतर कोरोना चाचणी केली नाही म्हणून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्याच्याच चुलत भावंडांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केलं होतं. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मनजीत सिंग असं या तरुणाचं नाव आहे. तो दिल्ली येथे रोजंदारी मजूर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो लॉकडाऊनमुळे आपल्या गावी मलकापूर येथे परतला होता. दिल्लीहून परतल्यानंतर त्याची थर्मल टेस्ट करण्यात आली होती. ती निगेटिव्ह असल्याने त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले नव्हते. मनजीत गावी परतल्यानंतर त्याचे चुलत भाऊ कपिल आणि मनोज हे त्याला कोरोना चाचणी करण्याविषयी सांगत होते.

मनजीत याने मात्र कोरोना चाचणी करण्यास नकार दिला होता. त्यावरून ते सतत त्याचा पिच्छा पुरवत होते. बुधवारी पुन्हा या तिघांमध्ये चाचणीचा विषय निघाला. तेव्हाही मनजीतने त्या दोघांना चाचणी करणार नसल्याचं सांगितलं. त्यावर त्या तिघांमध्ये वादाची ठिणगी पडली. हळूहळू विषय हमरीतुमरीवर आला आणि मनोज व कपिलने काठ्यांनी मनजीतला मारायला सुरुवात केली. या मारहाणीत मनजीतच्या डोक्यावर आणि खांद्याला जबर दुखापत झाली.

त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मनजीत याचे वडील कल्याण सिंग यांनी या प्रकरणी कपिल, मनोज, त्यांची आई पुनिया आणि मनोजची पत्नी डॉली यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या