
दिल्लीच्या विधानसभा परिसरात सोमवारी एका कारचालकाने थेट व्हीआयपी गेटमधून प्रवेश करत सुरक्षा यंत्रणांना आव्हान दिले होते. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस चौकशीमध्ये आरोपी सरबजीत सिंग याने धक्कादायक दावा केला आहे. बेपत्ता भाच्याच्या तपासाकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी हे धाडस उचलल्याचे सरबजीतने म्हटले आहे. मात्र या घटनेमुळे राजधानीत सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास दिल्ली विधान भवनाच्या गेट क्रमांक 2चे लोखंडी प्रवेशद्वारातून पांढऱ्या रंगाची टाटा सिएरा (क्र. यूपी 26, एझेड 8090) ही गाडी घेऊन एक जण विधान भवनाच्या परिसरात शिरला. सीआरपीएफचे जवान तैनात असतानाही कार बॅरेकेट्स तोडून आत शिरल्याने सुरक्षा यंत्रणा हादरून गेली. अतिशय वेगाने मास्कधारी चालकाने गाडी चालवत आत नेली आणि विधानसभा अध्यक्षांच्या वाहनात एक पुष्पगुच्छ आणि हार ठेवला. त्यानंतर तो तेवढ्याच वेगाने तेथून गाडी घेऊन पसार झाला. अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला.
पोलिसांनी शोधमोहीम राबवत या मास्कधारी चालकाला अटक केली असून कार ताब्यात घेण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. आरोपींपैकी एकाचे नाव सरबजीत असे असून तो उत्तर प्रदेशच्या पिलिभीत येथील रहिवाशी आहे. त्याने पोलीस चौकशीमध्ये धक्कादायक दावा केला आहे.
पोलीस चौकशीदरम्यान सरबजीतने सांगितले की, त्याचा 20 वर्षीय भाचा हरमन सिंह 1 एप्रिलपासून हरिनगरमधून बेपत्ता आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही तपास पुढे सरकत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कृत्य केले. दुसरीकडे सरबजीत गेल्या डिसेंबरपासून मानसिक आजारावर उपचार घेत आहे. तो पाच दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. पुतण्या हरवल्यामुळे तो अधिक अस्वस्थ झाला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. मात्र पोलिसांनी सरबजीत मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा दावा फेटाळला आहे.
दरम्यान, सरबजीतला दिल्लीचे रस्ते माहित नसल्याने त्याने दोन टॅक्सी चालकांना 2000 रुपये देऊन मार्गदर्शन करण्यासाठी गाडीत बसवले होते. विधानसभा परिसरातून बाहेर पडल्यावर तो संसदेच्या दिशेने जाण्याचा विचार करत होता. सध्या पोलीस या टॅक्सी चालकांचीही चौकशी करत आहेत.


























































