‘रो-रो’तून पडून चालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रोहा ते वैरणा असा कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेने ट्रक घेऊन निघालेल्या चालकाचा रोरोतून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उक्षी रेल्वे स्थानकाजवळ जवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशाराम बकीराम वैष्णोई (वय-३७,रा.जोधपूर) यांच्या मालकीचा ट्रक असून तो ट्रक रेल्वेच्या रो-रो मधून रोहा ते वेरणा असे घेऊन निघाले होते. बुधवारी सकाळी त्यांची रोरो उक्षी रेल्वे स्थानका दरम्यान आली असता रोरोतून केशाराम हे ट्रॅकवर पडले.त्याना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह ट्रॅक नजीक पडलेला होता. त्याच दरम्यान रत्नागिरी-दादर पॅसेंजर तेथून गेली. पॅसेंजरच्या लोको पायलटने मृतदेह पाहिल्याने त्यांनी उक्षी स्टेशन मास्तर यांना त्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच उक्षी स्टेशन मास्तरांनी बेलापूर कंट्रोलला त्याबाबत कळविले. बेलापूर येथून रत्नागिरी आरपीएफला कळविण्यात आले. ही माहिती मिळताच आरपीएफचे कर्मचारी उक्षी येथे घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास एएसआय पद्माकर गुंडये,पोकॉ. अजय कांबळे करीत आहेत.