कर्ली खाडीपात्रात मासे पकडण्यास गेलेल्या इसमाचा मृत्यू

40

सामना प्रतिनिधी । मालवण

नेरुरपार कर्ली खाडीमध्ये कुबे (मुळे) काढायला गेलेल्या राजन उर्फ बबन बाळकृष्ण पारकर (४२) यांचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मालवण येथील आपत्कालीन ग्रुपच्या सदस्यांनी खाडीत बुडालेला पारकर यांचा मृतदेह बाहेर काढला.

नेरूरपार येथे राहणारे बबन पारकर हे गुरुवारी सकाळी नेरूरपार खाडीमध्ये पुलानजीकच्या भागात कुबे (मुळे) काढण्यास गेले होते. मात्र या दरम्यान पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खाडीच्या पाण्यात बुडाले. ते बुडाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांच्या कुटूंबियांनी व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळी पारकर यांचा मृतदेह न सापडल्याने मृतदेह शोधण्यासाठी मालवण येथील आपत्कालीन ग्रुपला पाचारण करण्यात आले. आपत्कालीन ग्रुपने तात्काळ नेरूरपार येथे दाखल होत स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने बबन पारकर यांचा मृतदेह शोधून काढला. पारकर यांचा मृतदेह खाडीतील एका खोलगट भागात अडकलेला होता. या शोधकार्यात आपत्कालीन ग्रुपचे दामोदर तोडणकर, योगेश मेस्त्री, वैभव खोबरेकर, इरफान खान, महेश शिंदे, कल्पेश वेंगुर्लेकर, विश्वास आचरेकर, तुषार मराळ आदी सदस्य सहभागी झाले होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

बबन पारकर यांचा खाडीत बुडून अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बबन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या