पाहा व्हिडीओ: सेल्फी घेतानाच लाट आली आणि तरुण समुद्रात बुडाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्यातील सिक्वेरिअम समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. रविवारी संध्याकाळी भरती असताना समुद्रकिनारी सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. शशीकुमार वसान (३३) असे त्या तरुणाचे नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा आहे.

सदर तरुण त्याच्या मित्र मैत्रिणींसोबत गोव्याला फिरायला आला होता. कंडोलिममधील सिक्वेरिअम समुद्रकिनाऱ्यावर ते फिरायला आले होते. त्यावेळी समुद्राला भरती असल्याने समुद्रालगत असलेल्या खडकांवर पाणी आदळत होते. त्यावेळी या ग्रुपमधील एक तरुणी व दोन तरुण खडकांवर उभे राहून सेल्फी घेत होते. त्याचवेळी एक मोठी लाट आली. यावेळी एक मुलगा आणि मुलगी असे दोघे मागे फेकले गेले आणि पुढे उभा असलेला शशीमात्र लाटेसोबत समुद्रात खेचला गेला. काही वेळ त्याच्या मित्र मैत्रिणींनाही काही समजले नाही मात्र नंतर शशी लाटेसोबत समुद्रात खेचला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक दलाला सांगितले. त्यानंतर शशीकुमारला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र काही वेळाने त्याचा मृतदेहच जीवरक्षक दलाच्या हाती लागला.