
एखाद्याचे नशीब कधी आणि कसे फळफळेल याचा काही नेम नाही. अचानक कोणाला लॉटरी लागते किंवा मोठा खजिना हाती लागतो. फ्रान्समधील एका व्यक्तीबाबत असेच घडले. या व्यक्तीला आपल्या घरातील बागेत स्विमिंग पूल बांधायचे होते. त्यासाठी खोदकाम करताना त्याला चक्क मोठा खजिना सापडला. ‘द इंडिपेंडेंट’ने यासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. खोदकाम करत असताना या व्यक्तीला अनेक पिशव्या पुरून ठेवलेल्या आढळल्या. त्याने त्या बाहेर काढल्या आणि त्या उघडताच त्याला सुखद धक्का बसला. त्यात सोन्याची बिस्किटे आणि नाणी होती. या सोन्याची किंमत 7 लाख युरो म्हणजे सुमारे 7 कोटी रुपये एवढी आहे. प्रशासनाने तपास केल्यानंतर हा खजिना त्याच्याच मालकीचा असल्याचा निर्णय देण्यात आला.






























































