
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला सातारा येथील न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दीपाली रोहित घाडगे असे मृत विवाहितेचे नाव आहे. रोहित भास्कर घाडगे (रा. जिंती (ता. फलटण) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. रोहित घाडगे याची पत्नी दीपाली यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत दीपाली यांच्या नातेवाईकांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. यात त्यांनी रोहित घाडगे व कुटुंबातील इतरांनी तिला उपाशी ठेवत कोंडून ठेवले तसेच वारंवार छळ करत दीपाली यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नमूद केले होते.
या गुह्याचा तपास सहायक निरीक्षक पी. पी. नागटिळक यांनी करत दोषारोपपत्र सातारा येथील न्यायालयात सादर केले. याची अंतिम सुनावणी दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्यासमोर झाली. साक्षीदारांनी नोंदविलेल्या साक्षी, परिस्थिती आणि वस्तुस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानत न्यायालयाने रोहित घाडगे याला सात वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या खटल्याच्या कामकाजासाठी उपअधीक्षक तानाजी बरडे, निरीक्षक धन्यकुमार गोडसे, उपनिरीक्षक राजेंद्र यादव, गजानन फरांदे, महिला कर्मचारी रहिमाबी शेख, अश्विनी घोरपडे, राजेंद्र कुंभार, अमित भरते, फलटणचे पैरवी अधिकारी मुश्ताक शेख हे कार्यरत होते.
































































