
सामना ऑनलाईन । मुंबई
एका ५२ वर्षीय महिलेचे आक्षेपार्ह स्थितीतले फोटो तिच्या पतीला व मुलींना पाठविणाऱ्या त्या महिलेच्या प्रियकराला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. सुनील हनुमंत संकक्ती असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचे गेल्या आठ वर्षांपासून त्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्यातील शारिरीक संबंधांच्यावेळी त्याने तिचे आक्षेपार्ह स्थितीतले काही फोटो काढले होते. त्याच फोटोच्या आधारे तो गेल्या काही दिवसांपासून पैशासाठी तिला ब्लॅकमेल करत होता.
पीडित महिला हिला दोन तरुण मुली असून ती पती व मुलींसोबत पायधुनी परिसरात राहते. गोवंडी येथे राहणाऱ्या सुनील हनुमंत संकक्ती यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांनी सुनील त्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो तिच्या घरच्यांना दाखवणार असल्याचे सांगून तिला ब्लॅकमेल करायला लागला. त्याने तिच्याकडून बरेच पैसे उकळले होते. मात्र जेव्हा ती महिला पैसे देण्यास असमर्थ ठरली तेव्हा त्याने तिचे फोटो तिच्या पतीला व दोन मुलींना पाठवले. त्यानंतर त्या महिलेने सुनीलविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सुनीलला अटक केली असून त्याच्यावर लैंगिक अत्याचार व जाणूनबुजून बदनामी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या महिलेचे फोटो हे सुनीलने मॉर्फ केलेले आहेत का याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

























































