राहुलजी हिंदीतच बोला, गुजराती अनुवाद नको…; भर सभेतच एका व्यक्तीने धरला अनुवादकाला थांबवण्याचा आग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-rally

गुजरातमध्ये आज राहुल गांधींचे भाषण सुरू असताना एका व्यक्तीने त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला आणि गुजरातीमध्ये भाषांतर करणाऱ्या अनुवादकाला थांबवून फक्त हिंदीतच बोलणे सुरू ठेवण्यास सांगितले.

‘तुम्ही हिंदीत बोला, आम्हाला समजेल. आम्हाला भाषांतराची गरज नाही’, असे तो व्यक्ती ओरडला.

त्यानंतर राहुल गांधींनी भाषण थांबवले त्याला स्टेजवरून विचारले, ‘फक्त हिंदी चालेल का?(चलेगा हिंदी?)’. जमावाने होकार दिला आणि अनुवादक थेट बाजूला जाऊन बसला.

राहुल गांधींची ही यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारा मधील पहिली निवडणूक सभा होती. सुरत जिल्ह्यातील महुवा येथे आदिवासींच्या मेळाव्याला संबोधित करत होते.

त्यांनी आदिवासींना देशाचे पहिले मालक म्हटले आणि भाजप त्यांचे हक्क हिरावून घेण्याचे काम करत असल्याचा दावा केला.

‘ते तुम्हाला ‘वनवासी’ म्हणतात. तुम्ही देशाचे पहिले मालक आहात असे ते म्हणत नाहीत, पण तुम्ही जंगलात राहता असे ते म्हणतात. तुम्हाला ते असे का म्हणतात? तुम्हाला फरक लक्षात येतो आहे का? याचा अर्थ तुम्ही शहरात राहावे असे त्यांना वाटत नाही, त्यांना ते नको आहे. तुमची मुलं इंजिनिअर, डॉक्टर बनतील, विमानं उडवायला शिकतील, इंग्रजी बोलायला शिकतील हे त्यांना नको असल्याचे ते म्हणाले.

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये आज हाय व्होल्टेज प्रचार सुरू आहे, कारण सत्तेचा दावा करणाऱ्या प्रमुख तीन पक्षांचे प्रमुख नेते राज्यभरात अनेक सभांना संबोधित करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या तीन सभांना संबोधित करत आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चार जाहीर सभा घेत आहेत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सभा घेत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे देखील रोड शोमध्ये सहभागी होणार असून सार्वजनिक सभांना संबोधित करणार आहेत.

182 सदस्य असलेल्या राज्य विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

गुजरातमध्ये 27 वर्षांहून अधिक काळ भाजपची सत्ता आहे आणि ते सातव्यांदा सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.