
भारत गणेशपुरे, अभिनेता
शेतकरी पुन्हा राजा बनावा!
सगळीकडे आलबेल व्हावे, ही इच्छा आहे. मुख्य म्हणजे शेतकऱयांच्या पाठीमागे सरकारने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. आपला देश कृषीप्रधान देश मानला जातो. पण आज सगळय़ात जास्त हालत खराब शेतकऱयांची आहे. या देशात शेती आणि शेतकऱयाला मान नाही, प्रतिष्ठा नाही. शेतकरी हा राजा आहे. तो पिकवतो म्हणून आपण खातो. पण आज त्याच्या पिकाला किंमत नाही. घाऊक बाजारात त्याला त्याचे पीक दोन रुपये किलोंनी विकावे लागते. पण तेच पीक किंवा भाजी मोठय़ा शहरात शंभर रुपयाच्या पुढे विकली जाते. या चक्रात त्याच्या हातात काहीच लागत नाही.
शेतकऱयांपर्यंत मदत पोहोचत नाही का, हे सरकारने पाहिले पाहिजे. आज शेतकऱयाला आपण सांत्वना देत आहोत, तसे व्हायला नको. एकेकाळी शेतकरी हा देशाचा अन्नदाता होता, राजा होता. तसा तो आजही बनायला हवा. शेतकरी पुन्हा राजा झाला पाहिजे, म्हणून येणाऱया केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत.




















































