सावत्र भावाकडून गळा चिरून भावाचा खून

785

सावत्र भावाच्या पत्नीच्या तोंडाला चिकटपट्टी लावून तिच्या समोर भावाचा खून करणाऱ्या सावत्र भाऊ आणि त्याच्या दोन साथीदारांना परभणी पोलिसांनी अवघ्या 6 दिवसात मुंबई येथून अटक केली आहे. परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ सूत्र हलवत आरोपींना गजाआड केले.

रंजना ज्ञानोबा अस्वार (रा. बोबडे टाकळी ता. परभणी) यांच्या फिर्यादी वरुन 8 नोव्हेंबर रोजी परभणी ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर प्रकरणात 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री तीन इसमांनी रंजना यांच्या घरात प्रवेश करुन तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर त्यांचा नवरा ज्ञानोबा अस्वार यांना बाहेर ओढत नेऊन धारदार शस्त्राने मानेवर वार करुन त्यांचा गळा चिरून खुन केला होता. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रविण मोरे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार केले. हे पथक आरोपीचे शोधासाठी तात्काळ रवाना झाले. जोगेश्वरी मुंबई, आळंदी पुणे व जोगेश्वर पश्चिम मुंबई येथून आरोपी अमोल बापुराव अस्वार (24 वर्ष रा. बोबडे टाकळी) (मयताचा सावत्र भाऊ), नितिन किशन घायाळ (26 वर्ष रा. केंदळी ता.मंठा) व बालासाहेब सखाराम माळवदे (वय 32 वर्ष, रा.दिग्रस खु ता.सेलू) या तिघांना ज्ञानोबा अस्वार याचा खुन केल्या प्रकरणी अटक केली. परभणी ग्रामीण येथे आज (गुरुवारी) आरोपींना हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, पोलीस निरिक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, हनुमंत जक्केवाड, हरिश्वचंद्र खुपसे, सय्यद मोबीन, किशोर चव्हाण, सय्यद मोईन, अरूण कांबळे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या