सोन्याच्या नाण्यांचे आमिष पडले 11 लाखांना, कापड व्यावसायिकाला लोखंडी नाणी देऊन फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोदकाम करताना सोने-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून चोरट्यांनी कमी किमतीत नाणी विक्रीच्या बहाण्याने बुधवार पेठेतील कापड व्यवसायिकाला तब्बल 11 लाखांचा गंडा घातला. ही घटना 1 ते 20 मार्च कालावधीत रविवार पेठ आणि बुधवार पेठेतील दुकानात घडली आहे.

याप्रकरणी घनशाम विठ्ठलदास लढ्ढा (वय 63,रा. रविवारपेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घनशाम हे कापड व्यवसायिक असून 1 मार्चला तिघेजण त्यांच्या दुकानात आले होते. त्यांनी घनशाम यांना कोल्हापुरात माझा भाऊ जेसीबीवर चालक असून, खोदकाम करताना त्याला सोने-चांदीची एक किलो नाणी सापडली असल्याचे सांगून विश्वास संपादित केला.

त्यासाठी चोरट्यांनी सुरुवातीला दोन सोन्याची खरी नाणी त्यांना दाखवली. त्यानंतर सर्व नाणी 11 लाख रुपयांत विक्रीचा व्यवहार ठरविला. त्यानंतर काही दिवसांनी चोरट्यांनी कापडी पिशवीत गुंडाळलेली एक किलोची नाणी त्यांच्याकडे देत रक्कम स्वीकारली. घनशाम यांनी नाणी गाळण्यासाठी सराफाकडे दिली असता, संबंधित नाणी सोन्याची नसून लोखंडी असल्याचे उघडकीस आले.

कमी किमतीत सोन्याची नाणीदेण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीने कापड व्यावसायिकाला 11 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून नागरिकांनी कमी पैशात मिळणाऱ्या खोट्या नाण्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता फसवणूक टाळावी.
– राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे