
नातेसंबंधातील मुलीशी लग्न न करण्यासाठी डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केल्याची घटना जत तालुक्यातील दरीबडची गावात घडली असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
धनाजी भागप्पा टेंगले (वय 20, रा. दरीबडची, ता. जत) असे मृताचे नाव आहे. राजू लेगरे व आदिनाथ हाक्के अशी अटक केलेल्यांची नावे आहते. याप्रकरणी धनाजीचे वडील भागाप्पा टेंगले यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली आहे.
गावातील एका मुलीशी धनाजीचे प्रेमसंबंध होते. ही मुलगी राजू लेंगरे याच्या नातेसंबंधातील होती. या मुलीशी लग्न करू नये म्हणून राजू लेंगरे व धनाजीत वाद होते. गुरुवारी रात्री आठ वाजता धनाजी दूध घालण्यास दरीबडची येथे गेला होता. मात्र, तो घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली असता, दरीबडची-करेवस्ती रस्त्यालगत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, पोलीस नाईक आगतराव मासाळ, उमर फकीर, लक्ष्मण बंडगर, बाबू पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान करून गावातील 10 ते 12 तरुणांना ताब्यात घेण्यात आले. यातील दोघा संशयितांकडे कसून चौकशी केली असता, धनाजीने नात्यातील मुलीशी लग्न करू नये, यासाठी हा खून केल्याची कबूली राजू आणि आदिनाथ यांनी दिली आहे.
































































