
सामना प्रतिनिधी । पुणे
प्रेयसीला भेटण्यासाठी ग्वाल्हेर येथून आलेल्या तरूणाने मुलींच्या हॉस्टेलमध्ये जाऊन भल्या सकाळी राडा घातला. सुरक्षा रक्षकाने आडविल्याने त्याच्या दिशेने गोळीबार केला. हॉस्टेलमध्ये आरडओरडा करून गोंधळ घालून पळून जाण्यासाठी चौथ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उडी मारली. या घटनेने खळबळ उडाली असून, सुदैवाने यात सुरक्षा रक्षकाला गोळी न लागल्याने ते बचावले. सुरज महेंद्रकुमार सोनी (25, रा. ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा रक्षक विजय बिऱ्हाडे (52) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज सोनी याने पुण्यातून इंजिनियरींगचे शिक्षण घेतले आहे. तो सध्या ग्वाल्हेर येथे आहे. इंजिनियरींग करताना त्याची निमकर कॉलेजमधील एका तरूणीची ओळख झाली. त्याचे तिच्यावर प्रेम होते. तो ग्वाल्हेरला गेल्यानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. गेल्या काही दिवसांपासून ही तरूणी त्याला टाळत असल्याने तो नैरश्यात होता. तो तिला भेटण्यासाठी म्हणून सोमवारी रात्री पुण्यात आला.
मंगळवारी सकाळी तो निमकर कॉलेजच्या गल्र्स हॉस्टेलमध्ये फिरत होता. त्यावेळी सुरक्षा रक्षक बिऱ्हाडे यांनी त्याला हटकून तू मुलींच्या हॉस्टेलमध्ये कसा काय आला, येथून बाहेर हो असे सांगिलते. त्यावेळी त्याने प्रेयसीचे नाव घेऊन मी तिला भेटण्यासाठी आलो आहे, आमचे बोलणे झाले आहे असे सांगितले. तरीही बिऱ्हाडे यांनी त्यास तेथून बाहेर हो असे त्याला सांगितले. त्यावेळी त्याने पिस्तुल काढून बिऱ्हाडे यांच्यावर रोखून धरली. बिऱ्हाडे यांना धक्कामारून बाजूला काढून तो हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावर गेला. तरूणीचे नाव घेऊन तो तिच्या रूमवर पोहोंचला, पण ही तरूणी रूममध्ये नसल्याने तो तिच्या नावाने आरडा ओरडा करत होता. सुरक्षा रक्षक बिऱ्हाडे यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले. बिऱ्हाडे हे त्याला धक्के मारून खाली जाण्यात सांगत असताना त्याने ‘अगर तुम यहां से नही गए तो मै तुम पे गोली चलाऊंगा’ असे म्हणत पिस्तुलमधून गोळी झाडली. त्याचा निशाना चुकल्याने बिऱ्हाडे हे थोडक्यात बचावले. त्यानंतर त्याने मै मेरी जान दे दुंगा असे म्हणत चौथ्या मजल्यावरून उडी मारली. तो दुसऱ्या मजल्याच्या लॉबीमध्ये पडल्याने त्याच्या पायाला मुका मार लागला. सुरक्षा रक्षकांनी त्याला बाजूला घेऊन पोलिसांना बोलावून घेतले. सुजर सोनीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दत्तात्रेय शिंदे करत आहेत.
तिच्या समोर स्वत:वर झाडणार होता गोळी
पोलिसांनी सुरजकडे केलेल्या चौकशीत त्याने पिस्तुल तिला मारण्यासाठी नाही तर तिच्या समोर स्वत:वर गोळी मारून आत्महत्या करण्यासाठी तो हॉस्टेलमध्ये गेला होता. गेल्या चार वर्षांपासून या दोघांची ओळख असून, ती टाळत असल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.






























































