विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्यानंतर केली आत्महत्या

murder

अंबरनाथमधील एका व्यक्तीने आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संदीप सक्सेना ( वय 39) असे प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सक्सेना यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त झाली आहे.

संदीप सक्सेना यांचे जयंती शाह (वय 36) हिच्याशी प्रेमसंबंध होते. जयंती विवाहित होत्या. अंबरनाथ येथील प्रसादम रेसिडन्सीमध्ये गुरुवारी दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. जयंती यांचे पती अजित आणि संदीप सक्सेना अंबरनाथमधील एमआयडीसीत एका कंपनीत एकत्र कामाला होते. तेथेच त्या दोघांची मैत्री झाली. अजितशी मैत्री वाढल्यावर सक्सेना यांची जयंतीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री होऊन त्याचे प्रेमसंबंध जुळले.

अजित यांनी 17 नोव्हेंबरला जयंती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. आपल्या बायकोबाबत सक्सेना यांना माहिती असवी असा विचार करून त्यांना विचारण्यासाठी अजितने सक्सेना यांना फोन केला. मात्र, सक्सेना फोन उचलत नसल्याने अजित त्यांच्या घरी पोहचला. सक्सेना यांच्या घरी पोहचल्यावर अजितला जयंती आणि सक्सेना यांचे मृतदेह आढळले.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सक्सेना यांनी इलेक्ट्रिक ग्राइंडरने जयंतीचा गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या