
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी दुपारी आपल्या कारमधून मीरामार परिसरात फेरफटका मारला. रविवारी त्यांना नियमित चाचणीसाठी गोमेकॉमध्ये नेण्यात आले होते. काही वेळातच ते दोनापावल येथील आपल्या घरी परतले होते. त्यांना पुन्हा गोमेकॉत न्यावे लागल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात असतानाच त्यांनी घराबाहेर पडून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लवकरच मुख्यमंत्री आपल्या कार्यालयात जाऊन काम सुरु करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री पर्रिकर यांची कृषीमंत्री तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सोमवारी भेट घेतली. रविवारीच पर्रिकर यांनी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात तपासणी करून घेतली होती. त्यांचे स्कॅनिंगही करून ते अहवाल दिल्लीच्या एम्स संस्थेला पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रीकर यांच्याशी राजकीय विषयांबाबत चर्चा केली. काही विकास कामांविषयीही चर्चा झाली. आपण दक्षिण गोव्यात जुवारी पुलाचे काम कसे चाललेय ते लवकरच पाहून येऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांना सांगितले. विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांना याबाबत सांगितले. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आपल्याला चांगली दिसली. ते खूपवेळ आपल्याशी बोलले. ते जुवारी पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आता लवकरच निघतील असे सरदेसाई यांनी जाहीर केले. यामुळे पत्रकारही जुवारी पुलाकडे जाऊन थांबले. मात्र मनोहर पर्रीकर प्रत्यक्षात दुपारी अडीचच्या सुमारास घरातून वाहनाने बाहेर आले व थेट मिरामारला त्यांचे वाहन गेले. तिथे एक फेरफटका मारून ते माघारी वळले.
पर्रिकर यांच्या सेवेसाठी गोमेकॉचे डॉ. कोलवाळकर कायम असतात. एम्सच्या दोघा डॉक्टरांनी गेल्याच आठवडयात पर्रिकर यांना गोमेकॉत येऊन तपासले होते. पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यांनी दिलेली औषधांना ते चांगला प्रतिसाद देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.























































