नोंद – मनातलं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रविप्रकाश कुलकर्णी

मन ही अशी अजब गोष्ट आहे की ज्याचा थांग आजतागायत कुणालाही लागलेला नाही. मग कोणी ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ असं म्हणेल तर एखादा ‘मनाच्या घावावर मनाची फुंकर’ असंदेखील म्हणतो.

असाच एक प्रयत्न म्हणजे मूळचे कवी पिंड असलेले पण आता प्रकाशक झालेले राजीव बर्वे यांनी भावलेल्या गोष्टींबद्दल आणि सुहृदांबद्दल जे प्रत्यक्षात बोलता आले नाही, मनातले सांगता आले नाही ते अनावृत्त पत्र लिहून सांगितलेले आहे. या संग्रहाचे नाव अर्थातच ‘मनातील पत्रे’ असून दिलीप राज प्रकाशनतर्फे तो प्रकाशित झाला आहे.

सुरुवातीला मनास, देवास, सूर्यास, सागरास आणि आरशास यांना लिहिलेली पत्रे म्हणजे त्यांच्याशी संवेदनाशील मनाने केलेला संवाद आहे. तेथे बर्वे यांचे लेखक म्हणून कसब दिसते. त्याबाबत त्यांचे चिंतन पहा… “माणुसकी ही अशी जादू आहे की आपण डोळ्यांनी ती पाहिली तर ती दिसते, कोणी दाखवली तरच भावते, केली तर कळते, मानली तर मिळते आणि ही सर्व आपण ओळखली तरच आयुष्यभर टिकते. आयुष्याकडे मागे वळून बघताना माणुसकीचा वास असलेली, आपल्या आयुष्यात आलेली जी माणसं आपण पाहू लागतो त्यांच्यामध्ये मग आपला देव म्हणजे तू दिसायला लागतोस.”

त्यानंतर बर्वे अकरा व्यक्तींविषयी आपलं मन मोकळं करतात. ज्यात त्यांची वहिनी, मुद्रक प्रमोद बापट, शंकर सारडा, ग्रंथ विक्रेते पां.ना. कुमठा, रोटरियन अरविंदराव ठोसर आणि वकील मित्र अजित जांभळी या दिवंगत व्यक्ती आहेत. या प्रत्येकाचे विशेष सांगताना लेखक म्हणतो, “जिव्हाळा, प्रेम या उपाधीच अशा आहेत की त्यासाठी कारण मीमांसा सांगता येत नाही. कोणाविषयी प्रेम वाटतं हे सांगता येईलच असं नाही.”

प्रत्येकाचं कार्यकर्तृत्व सांगताना बर्वे त्या व्यक्तीचं जणू अनुभवामृत वाचकांपुमांडतात. ‘खिशात किती आहे हे महत्त्वाचे नाही तर आपण खुशीत किती आहोत हे महत्त्वाचं हे तुझं ब्रीद होतं’, ‘मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखे आहे हे समजायला ज्ञान लागत’, ‘राग आणि वादळ दोन्ही सारखंच. शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालं ते.’

या पत्रांची कारणंदेखील वेधक आहेत. लेखक म्हणतो, “एखाद्या फार मोठय़ा जनसामान्यांपेक्षा वेगळ्या व्यक्तीविषयी आपल्या भावना बऱ्याच वेळा विशिष्ट व्यक्तिमत्वामुळे आपण समोर उभे राहून समक्ष व्यक्त करू शकत नाही. त्यासाठी पत्र हा किती चांगला आधार असतो, नाही का? तानाजीराव तुमच्या बाबतीत माझे अगदी असेच आहे. तानाजीराव चोरगे या माणसाने कृषी विद्यापीठ स्थापन करण्यापर्यंत जी मजल मारली ती अचंबित करणारीच.”

तर बर्वे आपल्या पत्नीबाबत सांगतात,

“परवा म्हणालीस पत्रलेखनाचे पुस्तक लिहितोयस तर मला पत्र लिहिणार आहेस की नाही? तुला पत्र लिहिल्याशिवाय पुस्तक कसं पूर्ण होणार? पण त्यासाठी पुण्याबाहेर जायला पाहिजे ना? आज कोल्हापूरला राहायचे आहे तेव्हा तुला पत्र लिहायला आजचा मुहूर्त नक्कीच चांगला आहे नाही का?”

त्यांची प्रेम कहाणी वेगळीच. ती वाचण्यातच गंमत आहे हे मुद्दाम सांगतो.

या संग्रहातील अगदी वेगळे पत्र आहे ते अविनाशला लिहिलेले. प्रसंगी मतभेद झाल्यानंतर जी अस्वस्थता आणि तगमग झाली त्याचा निचरा व्हावा हे त्याचं कारण आहे.

पण हे आग्रह विरून जावे म्हणून मित्राला केलेले आवाहन बेमिसाल आहे.

चिपळूणचे प्रकाश देशपांडे आणि डोंबिवलीचे रवि प्रकाश यांना लिहिलेली पत्रं म्हणजे प्रेमाचे आलेले भरते.

अशी दिलखुलास पत्रे वाचून कुणालाही हा लेखकाचा भाबडेपणा वाटेल. पण त्याला आपल्या मित्राचे जाणतेपण सांगताना बर्वे यांनी म्हटलेय, “चूक शोधण्याची दृष्टी प्रत्येकाकडे असते. पण गुण शोधण्याचा दृष्टिकोन काहींकडेच असतो.”

हा गुण लेखकाने अंगीकारला आहे असे वाटते.