
पुणे भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी मंदाकिनी यांना अटकेपासून दिलेले संरक्षण 19 एप्रिलपर्यंत कायम ठेवले आहे.
भोसरी येथील भूखंड घोटाळ्या प्रकरणी एकनाथ खडसे तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केले असून या सर्वांवर मनी लॉण्ड्रिंगचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच विशेष न्यायालयात खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्याने पीएमएलए कोर्टाने मंदाकिनी यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.
या प्रकरणी अटक होऊ नये यासाठी मंदाकिनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी मंदाकिनी यांच्या वतीने अॅड. मोहन टेकवडे यांनी बाजू मांडली.



























































