ललित – आहे मनोहर तरी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगत विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते.  हे  तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

आमच्या सोसायटीत आम्ही ज्येष्ठ नागरिक वाढदिवस साजरे करतो. इतके दिवस वाढदिवसानिमित्त बुके वगैरे देत असू. नंतर काहीतरी भेटवस्तू द्यावी असा बूट निघाला. आमच्यातले सर्वात तरुण तुर्क… वय वर्षे पंचाऐंशी! भल्लाजींनी प्रस्ताव मांडला, ‘अरे यार, हरेक को कॉफी मग दे देते है! उस मग पे बर्थडे बॉय का पह्टो और उसका नाम प्रिंट किया जायेगा!’ सगळ्यांना ही कल्पना आवडली. गेल्या वर्षापासून हे अमलात आणलं गेलं. सगळे त्या उत्सवमूर्तीच्या घरी जायचे, केकसह नाश्ता चापायचे आणि ते गिफ्ट त्याच्या हातात द्यायचे. इथपर्यंत ठीक होतं, पण लवकरच म्हणजे वर्ष पुरे होत असताना नवीन बूट निघाला,

‘भल्लाजी! कुछ नया प्रेझेंट के बारे मे सोचो! ये क्या है, ये कप का अभी पंटाळा आया हय! कूच तो बी नवीन होना मंगता है!’ इति देशमुख ऊर्फ प्राइम मिनिस्टर! त्यावर विचारविनिमय सुरू झाला. शेवटी असे ठरले की, एखादे आर्टिफिशियल बोन्साय देऊया. या वेळी देशमुखांचाच वाढदिवस होता!

‘ओ बंधू! मला वडाचेच झाड फायजेल!’ मीही उत्साहात होतो. मी सरळ आमच्याच सोसायटीतल्या राजुभाई गुजराथींना पह्न केला. त्यांच्या सूनबाई आर्टिफिशियल फुलझाडांचे शोरूम चालवतात. आणि आश्चर्य म्हणजे ते बोन्साय मिळालेही आणि तेही चक्क वडाचे! मोठय़ा प्रचंड वृक्षाची ती छोटी प्रतिकृती अत्यंत सुबक आणि आकर्षक होती, अगदी पारंब्यासकट! आम्हा सगळ्यांनाच ते आवडले. याच श्रेणीतली आंब्याची, चेरीची, पिंपळाची, लिंबाची झाडेही उपलब्ध असल्याचे त्यांनी संगितले. या निमित्ताने माझी एक आठवण जागी झाली. फार पूर्वी मी बोन्सायच्या नादी  लागलो होतो. पुंडय़ात रोप लावायचे, पुंडय़ाला खाली छिद्रे पाडायची, तांब्याच्या तारा पुंडय़ाभोवती आवळायच्या, त्यात छोटी दगडाची खडी भरायची. अगदी कमी पाणी द्यायचे, जेणेकरून झाड मरू नये. त्या हलक्याशा अन्नावर ते कसेबसे तग धरायचे. ते जागच्या जागी अंग धरायचे, पण वाढायचे नाही. पुढे शक्य तेवढी उंची गाठून त्याचा आकार तेवढय़ापुरताच डेरेदार व्हायचा. त्याची वाढ खुंटलेली असायची. मी माझ्या एका मित्राकडे उत्सुकतेने ही बोन्साय पाहायला जायचो तेव्हा सुरुवातीला खूप छान वाटायचे, पण नंतर नंतर मला त्यांची दया यायला लागली. आकाशाशी स्पर्धा करू शकणाऱया या बिजाला खुंटवून त्याचा लोळागोळा करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? असे काहीसे विचार मनात येऊ लागले आणि बोन्सायमधला माझा इंटरेस्ट संपला! जी झाडे मला आकर्षक वाटायची ती मला दीनवाणी दिसायला लागली.

अनुभव दुसरा 

‘अहो! आपण लव्हबर्डस् आणूया ना! आपल्या घराला शोभा येईल!’ मला ही कल्पना पसंत पडली. मी उत्साहाने एक पिंजरा विकत आणला. ते छोटे रंगीबेरंगी पक्षी मिळवले आणि त्यात ठेवले. आमची पहाट त्यांच्या चिवचिवाटाने प्रसन्न होऊ लागली. मीही त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करू लागलो. त्यांचे खाद्य त्यांना पुरवत होतो. पाहुणे मंडळी या पक्ष्यांना पाहून नवल करायची. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले की मी पिंजऱयापाशी आलो की, ते सगळे माना फिरवून आपसात अगम्य आवाजात काहीतरी कुजबुजायचे. बहुतेक त्यांना माझी दहशत बसली असावी. मला वाईट वाटले. त्यातच एके दिवशी चिरंजीव बोलले, ‘बाबा, त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे तुम्ही! हा अधिकार तुम्हाला कुणी दिला?’ तिरीमिरीत मी तो पिंजरा बाहेर अंगणात नेला आणि त्याचे दार उघडले! इतके दिवस काsंडून घातल्याने त्या चिमुकल्यांना पंखसुद्धा पसरता येईनात! त्यांना उडताच येईना. त्या दिवशी माझ्या वाटय़ाला जे अपराधीपण आले ते आजतागायत माझ्यासोबत आहे.

अनुभव तिसरा

लातूरला एके वर्षी भरपूर पाऊस झाला होता. शहराच्या बाहेर आमच्या हॉटेलची एक शाखा होती. त्याच्या बाजूने एक नाला वाहत होता. तिथून कासवांची छोटी पिले वाहत चालली होती. एकाने एक पिलू पकडून बाबांकडे- माझ्या थोरल्या बंधूंकडे सुपूर्द केले. ते छोटे पिलू इतके देखणे होते की, त्यांनाही मोह आवरला नाही. लगेच एक काचेचा मोठा गोल आणून त्यात पाणी भरून त्यात त्याला सोडले. ते मजेत पोहू लागले. त्याच्या अन्नपदार्थांची माहिती घेऊन ते त्याला पुरवले गेले. परिणामी ते थोडय़ाच दिवसात अंग धरू लागले. नंतर नंतर त्याची पूर्ण वाढ झाली. त्या काचेच्या गोलात ते मावेना. त्याचा गुदमर होऊ लागला, म्हणून त्याला बाहेरच्या हौदात सोडले! त्याचे हाल बाबांना पाहवेनात. ‘याला जबाबदार मीच आहे रे! त्याची वाढ, स्वातंत्र्य मी खुंटवून टाकलं! कशासाठी? तर मला बरे वाटावे म्हणून! माझ्या आनंदासाठी मी त्याचा आनंद हिरावून घेतला. छे, छे! घोर पाप घडले माझ्या हातून!’ शेवटी त्याला नदीत सोडून दिलं. बोन्साय असो, पक्षी असो, प्राणी असो. ते कितीही छान, सुंदर, मोहक दिसत असले तरी त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे हा अमानवीय अपराध आहे आणि आपण जर ते करत असू तर पाषाण आणि या युगात साम्य अजूनही आहे असे मला तरी वाटते. आज कितीतरी दिवसांनी ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ या ओळींची आठवण झाली!

[email protected]