अवलिया – भुऱ्या!

>> मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

भुऱया! गणपतीचे चांगले विनायक नाव असताना त्याच्या निळसर घाऱया डोळ्यांमुळे त्याला हे नाव पडले असावे. मीही त्याला याच नावाने हाका मारू लागलो होतो. वय वर्षे चार किंवा पाच. देह लोकरीच्या गुंडय़ासारखा, तेजस्वी गौरवर्ण, मोठ्ठे डोळे, गालांमध्ये चेपलेलं एवढेसे वर आलेले नाक, जिवणी हसरी. एक वर्षाखाली आमच्या घरी काम करणाऱया त्याच्या आईबरोबर त्याचे आगमन झाले आणि मी त्याला घेण्यासाठी हात पुढे केले. तोही माझ्याकडे झेपावला. क्षणार्धात त्याची माझी दोस्ती जमून गेली. नंतर मी त्याची वाट पाहायला लागलो. एक दिवसाआड का होईना, तो आईच्या कडेवर बसून यायचा. आला की, त्याच्या खोडय़ा सुरू होत. ‘हिला’ ते त्रासदायक वाटायचे. कारण हिने डेकोरेशनसाठी सजवून ठेवलेल्या वस्तू तो बिनदिक्कत विस्कटून टाकायचा. बोबडे बोलत घरभर धिंगाणा घालायचा. ही रागावली की, रडवं तोंड घेऊन माझ्या मांडीवर येऊन बसायचा. तिच्याकडे रागाने पाहात निषेध व्यक्त करायचा. घरातले त्याचे सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे माझी मांडी! माझ्या मांडीवर लोळणे, उभे राहून मानेला विळखा घालणे. भुऱया म्हणजे मोठे मानी व्यक्तिमत्त्व होते. बोलता येत असून बोलण्याचा कंटाळा करायचा. ‘ही’ त्याची फिरकी घ्यायची.
‘’अहो! याला बोलता येत नाही बरं का!”
‘’होय? तुला बोलता येत नाही?” मी विचारायचो. तो मोठ्ठे डोळे करून माझ्याकडे पाहायचा.
“भुऱया, ते गाणं म्हण पाहू!” मी आग्रह करायचो. तेव्हा मात्र तो बोबडय़ा आवाजात एखादे गाणे म्हणायचा. मग मी त्याला एक चॉकलेट बक्षीस द्यायचो. नंतर साहेबांनी माझी पोथी ओळखली. “गाणे म्हण” म्हटले की, हात पुढे करायचा. तेवढी लाच मिळाली की, मग एक गाणे आम्हाला ऐकायला मिळायचे. एखाद्या दिवशी आम्ही दोघेही गुंतलेले असलो तर माझ्या मानेभोवती गोबऱया हातांचा वेढा घालून पुटपुटायचा, “गाणं?” मला कळायचे, ही लाडीगोडी कशासाठी आहे ते. तो फुरंगटायचा. मी बधत नाही हे बघून पुन्हा कानात “म्हंतो ना बाबा,” असे आर्जव करायचा. मी त्याला जवळ घेऊन कुरवाळून “बरं, म्हण” म्हटले की, कमळाच्या पाकळीसारखा गुलाबी हात पुढे व्हायचा. त्या हातावर चॉकलेट ठेवले की, मग शाळेत शिकवलेले तेच नेहमीचे गाणे म्हणायचा. दिवसेंदिवस त्याच्या खोडय़ा वाढत चालल्या होत्या. ‘ही’ ओरडायची, पण माझा भक्कम पाठिंबा असल्याने तो त्या ओरडय़ाकडे फारसे लक्ष देत नसे. एकदा मात्र कहर झाला. एक सुंदर फ्लॉवरपॉट त्याच्या धक्क्याने खाली पडून फुटला. ‘ही’ संतापली,
“काय खोडील कार्टं आहे! मूर्खा… नीट एका जागी बसता येत नाही का?…” वगैरे, ‘हिच्या’ तोंडाचा पट्टा सुरू झाला. हा ओठ बाहेर काढून रडव्या चेहऱयाने माझ्या कुशीत शिरला. मीही वैतागलो होतो, पण त्याचा केविलवाणा चेहरा पाहून कसेसेच होऊन गेले. मी त्याला जवळ घेऊन थोपटत राहिलो. थोडय़ा वेळाने ‘हिचा’ राग शांत झाला. तिलाही वाईट वाटले. ती जवळ आली, “भुऱया! रागावलास? अरे, अशा खोडय़ा करू नये. किती वेळा तुला सांगितलंय.” तो काही तिच्याकडे पाहीना. “भुऱया, आज तुला मी चॉकलेट देणार आहे, पाहिजे ना?”
त्याने हळूच मान वर केली, तिच्याकडे पाहिले आणि असा गोड हसला. तिने त्याला ओढून आपल्या जवळ घेतले. एकाऐवजी दोन चॉकलेटं दिली. त्या मोबदल्यात त्याने तिला माफ करून टाकले असावे. त्याच्या आईवडिलांपेक्षाही जास्त वेळ तो आमच्याकडेच असायचा. आम्हा दोघांना तो आई, बाबाच म्हणायचा. त्याचा आम्हाला लळा लागला होता. एखादा दिवस तो आला नाही तर आम्हाला करमेनासे होऊन जायचे. दिवस कंटाळवाणा होऊन जायचा. अशातच त्याच्या आईला माहेरी बोलावणे आले.
“दोनचार दिवसांसाठी जातेय, आठवडाभरात परत येते.” असं सांगून तिने ‘हिचा’ निरोप घेतला आणि कोरोना -लॉकडाऊन सुरू झाले. ती अडकून पडली. असे चारेक महिने गेले. शेवटी नाना खटपटी करून हे कुटुंब परतले. दुसऱयाच दिवशी ती भुऱयाला घेऊन आमच्या घरी आली. आम्ही आनंदानं वेडे व्हायचे बाकी होतो.
भुऱया समोर येताच मी हात पुढे केले,
‘’ये मित्रा!”
त्याने माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहिले आणि मान फिरवून घेतली. ‘हिच्या’कडेही पाहीना.
‘’भुऱया, चॉकलेट!”
मी त्याला लालूच दाखवली. तरीही त्याने आईच्या खांद्यावरून मान काढली नाही.
‘’ओळख बुजली की काय!” त्याची आई पुटपुटली.
नंतर मी त्याला आवडणारे आवाज काढून दाखवले, तोंड वेडेवाकडे करून दाखवले. माझे तसे तोंड पाहताना एरवी खदखदा हसणारा भुऱया चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहू लागला.
‘’आई… चल ना घरी.”
‘’जा बाई. तो कंटाळलेला दिसतोय.” ‘ही’ म्हणाली. ती गेली.
‘’अहो, तुम्ही का असे मनाला लावून घेताय?” ही समजूतदारपणे म्हणाली.
‘’छे, छे ! मी कुठे काय…” मी कसेबसे बोललो.

[email protected]