आंबा बागायतदारांचे प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष, हिवाळी अधिवेशनापूर्वी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकार कोकणातील आंबा बागायतदारांकडे लक्ष देत नसल्याने बागायतदारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय बागायतदारांनी घेतला आहे. हिवाळी अधिवेशनापूवीं उपोषणाचे हत्यार उपसले जाणार असल्याचा इशाराच आंबा बागायतदारांनी दिला आहे. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंबा बागायतदारांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी आंबा शेतकरी प्रकाश साळवी, प्रदीप सावंत, शेतीतज्ज्ञ अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर, रामचंद्र मोहीते, नरेंद्र रसाळ, सुधीर देवळेकर, दिनेश भडवळकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

आंबा बागायतदारांना 2015मध्ये मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. यावेळी कर्जाच्या तीन महिन्याच्या व्याजाचा परतावा देण्याची घोषणा शासनाने केली होती. मागील आठ वर्षात त्यातील एकही पैसा मिळाला नाही. वारंवार मागण्या, आंदोलन केल्यानंतर जवळपास 12 हजारहून अधिक आंबा बागायतदारांची यादी तयार करण्यात आली. त्यातील आतापर्यंत फक्त 78 जणांना व्याजाचा परतावा देण्यात आला आहे. आंबा शेतकर्‍यांची ही एक प्रकारची चेष्टाच असल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वच आंबा शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला पाहिजे असे मत यावेळी प्रकाश साळवी यांनी मांडले.

कर्नाटक आंब्याचे आक्रमण मोडून काढण्यासाठी प्रशासनाने व कृषि विभागाने प्रयत्न करायला हवेत. हापूस ऐवजी कर्नाटक आंबा म्हणून विक्री करण्यास आमची हरकत नाही, परंतु हापूस म्हणून तो विकला जाऊ नये अशी भूमिका शेतकर्‍यांनी व्यक्त केली. आंबा बागायतदारांचे प्रश्न सुटावेत यासाठी वारंवार निवेदने देऊनही मार्ग निघत नसल्याने हिवाळी अधिवेशनापूर्वी उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी आंबा बागातदारांनी दिला.