साईप्रसादालयात साडेसात टन केशर आंब्याचा ‘आमरस’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mango-juice-at-shirdi-sai-baba

सामना ऑनलाईन । शिर्डी

साई संस्थानच्या प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात आली आहे. शिरूर येथील भाविकाने साई संस्थानला साडेसात टन केशर आंबा दान स्वरूपात दिला आहे. त्यातूनच पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी आमरसाचा आस्वाद घेतला.

आमरस भोजनासाठी शिरूर जिल्हा पुणे येथील एका भाविकाने तब्बल सात हजार सातशे चाळीस किलो केशर आंबा साईबाबांचरणी अर्पण केला आहे. आज संस्थान भोजनालयात किमान पन्नास हजार भाविकांनी आमरसाचा आस्वाद दिवसभरात घेतला. दानशूर भाविकाने आपले नाव गुपित ठेवण्याची विनंती साईबाबा संस्थानला केली.

साईबाबांवर असलेल्या श्रद्धेखातर हे दान दिल्याचे भाविकाने सांगितले. केशर जातीचा हा आंबा सेंद्रिय असून संस्थानच्या साई प्रसादालयात आज पहाटेपासूनच आंब्याचा रस बनवण्यास सुरुवात झाली. संस्थानकडे आंबा रस बनवण्याची मशिनरी नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात मशिनरी उपलब्ध करण्यात आल्याचे प्रसादालयाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रसादालयाचे व्यवस्थापक विष्णू थोरात यांनी सांगितले की, साई प्रसादालयात भाविकांच्या देणगीतून मोफत भोजन दिले जाते. रोजच्या आहारात पोळीभाजी, डाळभात त्याचबरोबर आज यासोबत गोड आंब्याचा रस पहिल्यांदाच भाविकांना मिळत असल्याने भाविकांनीही समाधान व्यक्त केले.

साई मंदिर प्रवेशद्वारावर एक वर्षाच्या आतील बालकांची होणार नोंद

साईबाबा मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी दर्शनबारीव्यतिरिक्त प्रत्येक प्रवेशद्वारावर एक वर्षाच्या आतील मुला-मुलींची नोंद करून पालकांची ओळख गेटवरील रजिस्टरमध्ये करण्याचा निर्णय साई संस्थान प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दर्शनबारीत अगोदर त्रस्त झालेल्या भाविकांना आता या नोंदणीसाठी आणखी उभे राहण्याची वेळ येणार असल्याने साईभक्तांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. साई मंदिराच्या जवळच गुरुस्थाननजीक आपल्या सहा महिन्यांच्या चिमुरडीला सोडून गेल्याने संस्थान प्रशासनाने या बाबतीत चौकशी सुरू केली होती. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून एक वर्षाच्या आतील बालकांची नोंद करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, चिमुरडीला सोडून गेलेली तिची आई परत तिचा शोध घेत दोन दिवसांनी शिर्डीला आली. कौटुंबिक वादामुळे तिने मुलीला शिर्डीत सोडले होते. ही महिला जळगाव जिह्यातील आहे.