
आंब्याची चव चाखायची आहे… तर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागणार आहे. यावर्षी गुलाबी थंडीत बहरणारा आंब्याचा मोहोर पुरता थंडावल्याने आंब्याची चव दुरच राहणार अशी भीती खवय्यांना वाटत आहे. थंडीची जागा कडक उष्म्याने घेतल्याने कोकणातील आंबा, काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे यंदाही दोन्ही पिके उशिरा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फक्त दोनच दिवस थंडी पडली. त्यानंतर सुरू झालेल्या कडक उष्म्याचे प्रमाण अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांत थंडी कमी प्रमाणात सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बागायतदारांसमोर अनेक संकटे आली आहेत. सातत्याने थंडी सुरू राहिली तरच आंबा, काजू झाडांवर मोहर येण्यास सुरुवात होईल. थंडी नसल्याने मोहर येण्याची प्रक्रिया काही दिवस लांबणीवर पडली आहे.
निसर्गातील हवामान बदलाचा फटका गेली काही वर्षे सातत्याने आंबा आणि काजूला बसत आहे. गतवर्षी काजूचे उत्पादन कमालीचे घटले. उत्पादन कमी असून लॉक डाऊनसारख्या परिस्थितीमुळे काजू बियांचा दर 50 ते 80 रुपये किलोपर्यंत वर खाली होत राहिला. आंबा असूनही बागायतदारांना तो लॉक डाऊनमधील अनेक अडचणींमुळे शहरी बाजारपेठेत पाठवता आला नाही. गतवर्षीचे नुकसान भरून निघेल अशा आशेवर असलेल्या बळीराजाच्या वाट्याला यंदाही निराशाच आली आहे.
आंबा पीक हवामान दृष्टचक्राच्या रडारवर
गेली काही वर्षे आंबा पीक हवामानाच्या दृष्टचक्रात अडकले आहे. दरवर्षी थंडी पडून मोहर आल्यानंतर वातावरण ढगाळ बनून मोहर काळा पडणे, फलधारणा झाल्यानंतर अती उष्णतेमुळे फळे आतून खराब होणे, फळांची गळती होणे अशा विविध प्रकारच्या संकटांचा सामना करून आंबा बागायतदार अक्षरश: हतबल आणि कर्जबाजारी झालेले आहेत. दरवर्षी नुकसान भरून निघेल या आशेवर असणाऱ्या बागायतदारांच्या पदरी निराशाच पडत आहे. या वर्षी दिवाळीपूर्वी केवळ दोनच दिवस थंडी पडली. त्यानंतर कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे हवामानात सतत बदल होत गेले. यामुळे कमालीचा उष्मा वाढून थंडी गायब झाली. काही भागात तर पावसाचाही शिडकावा झाला. या वातावरणाचा विपरीत परिणाम होऊन आंब्याला मोहर येण्याऐवजी झाडांना नवी पालवी फुटली. झाडांना नव्याने पालवी आल्याने मोहर लांबला आहे.
आंबा बागांची खरेदी घटली
कोकणच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या आंबा कलमांना पालवी आली असल्याने प्रत्यक्षात मोहर येण्यास आणखी महिनाभराचा कालावधी उलटेल असा अंदाज बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. आंब्याला आलेल्या मोहरावर आंबा बागायतदार बागांचे व्यवहार करतात. मात्र गेली काही वर्षे झाडांना येणारा मोहर आणि त्यानंतर वातावरणात होणारा बदल यामुळे व्यापाऱ्यांचे अंदाज चुकून नुकसानाला तोंड देण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने आता मोहर पाहून बागांच्या खरेदीत घट झाली आहे.


























































